'समृद्धी'साठी सरकारचा 'सोशल' प्रचार

श्रीकांत सावंत
बुधवार, 12 जुलै 2017

गैरसमज दूर करण्यासाठी फेसबुक पेज; समाज माध्यमांचा प्रथमच वापर
ठाणे - मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांच्या वाढत्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या महामार्गाचा "सोशल प्रचार' सुरू केला आहे.

गैरसमज दूर करण्यासाठी फेसबुक पेज; समाज माध्यमांचा प्रथमच वापर
ठाणे - मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांच्या वाढत्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या महामार्गाचा "सोशल प्रचार' सुरू केला आहे.

त्यासाठी फेसबुकवर "महाराष्ट्र समृद्धी महामार्ग' नावाने पेज सुरू करण्यात आले असून, त्यावर या प्रकल्पाच्या जाहिराती करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून या प्रकल्पाबाबत सोशल मीडियावरून पसरवल्या जात असलेल्या गैरसमजांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. एकाद्या प्रकल्पाच्या प्रचारासाठी सरकारी यंत्रणांनी अशा प्रकारे सोशल मीडियाचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ असावी.

हे पेज दररोज अपडेट केले जात आहे. त्यात या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसाठींच्या नवनवीन योजना, सरकारी घोषणांची माहिती दिली जात आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांच्या वेशभूषेतील मॉडेल्सच्या छायाचित्रांच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी जमिनी देण्याचे आवाहनही शेतकऱ्यांना केले जात आहे. मात्र, या प्रकल्पासंदर्भात शेतकऱ्यांसोबत झालेल्या बैठकांची किंवा प्रकल्पासाठी आतापर्यंत झालेल्या भूसंपादनाची माहिती त्यात नाही.

या महामार्गाविरोधातील आंदोलनाची धार तीव्र करण्यासाठी या आंदोलनातील कार्यकर्ते; तसेच संस्थांनीही फेसबुक पेज तयार केले आहेत. जिल्हावार संघर्ष समित्यांची वेगवेगळी पेज आहेत. त्यामार्फत सर्वसामान्य नागरिकांचा या आंदोलनास पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या या "सोशल प्रचारा'ला उत्तर देण्यासाठी "एमएसआरडीसी'ने फेसबुक पेज केल्यामुळे या महामार्गावरून सरकार आणि शेतकऱ्यांदरम्यान रस्त्यावरील संघर्षाबरोबरच "व्हर्च्युअल संघर्ष'ही पेटल्याचे चित्र आहे.

कोणत्याही शेतकऱ्याने या प्रकल्पासाठी जमीन देण्याचे आवाहन केलेले नसताना सरकारच्या फेसबुक पेजवर मॉडेलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फसविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हा महामार्ग शेतकऱ्यांची नव्हे; तर गुंतवणूकदारांना समृद्ध करणारा असेल. सरकारने कितीही प्रचार केला तरी शेतकऱ्यांच्या भूमिकेत बदल होणार नाही.
- बबन हरणे, समन्वयक, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गविरोधी शेतकरी संघर्ष समिती.

या महामार्गाविषयी वृत्तपत्रे, वृत्त वाहिन्यांबरोबरच सोशल मीडियावरूनही गैरसमज पसरवले जात आहेत. ते दूर करून लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही फेसबुक पेज सुरू केले आहे.
- किरण कुरुंदकर, सहव्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी.

Web Title: thane news government social publicity for samruddhi highway