गणपती बाप्‍पालाही जीएसटीची झळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

तुर्भे - पावसाळा सुरू होताच वेध लागतात ते गणरायाच्या आगमनाचे! गणेशोत्सवासाठी आतापासून मूर्ती बनविण्यासाठी लगबग सुरू झाली आहे; परंतु यावेळी वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीचा मोठा फटका मूर्तिकारांना बसणार आहे. जीएसटीमुळे शाडू आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे मूर्तींच्या किमतीत ३० ते ३५ टक्के वाढ होणार आहे. विशेष म्हणजे यंदा बाप्पाचे आगमन थोडे लवकर होणार आहे. त्यामुळे मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे. 

जीएसटी १ जुलैपासून देशात लागू होणार आहे. यामध्ये शाडू आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचाही समावेश आहे. या दोन्ही वस्तूंवर जवळपास १८ टक्के जीएसटी लागू होणार आहे. गणपतीच्या मूर्ती बनविण्यासाठी या दोन्हींची गरज असल्याने त्याचा मोठा फटका मूर्तिकारांना बसणार आहे. कच्च्या मालाच्या किमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे गणपतीच्या मूर्ती महागणार आहेत. 

शाडूची एक फुटाची मूर्ती साधारणपणे तीन हजारांना मिळत होती; परंतु आता यावेळी जीएसटीमुळे तिच्या किमतीत ४५० रुपयांनी वाढ होण्याची शक्‍यता आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसची एक फुटाची मूर्ती हजार रुपयांना मिळत होती. तिच्या किमतीतही यामुळे ३०० रुपयांची वाढ होणार आहे. शहरातील चित्र शाळांमध्ये गणेशमूर्ती बनवण्याचे काम जवळपास ५० टक्के पूर्ण झाले आहे. सध्या रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. 

मूर्तीच्या किमती नक्षीकामावर अवलंबून असतात. मग मूर्ती भले एक फुटाची असो. तिचे नक्षीकाम उत्तम असेल तर ती १५ हजारांच्या घरात जाते. शाडूची, प्लॉस्टर ऑफ पॅरिस, प्लास्टिक पेंट, वॉटर पेंट, काथ्या यांच्या किमतीत ३० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. याचाही परिणाम मूर्तींच्या किमतीवर झाला आहे. 

गणेशमूर्तींच्या व्यवसायावर हजारो जणांचा रोजगार अवलंबून आहे. त्यामुळे त्यांच्यावरही जीएसटीचा परिणाम होणार आहे. गणपतीच्या मूर्तींची किंमत वाढल्याने त्याचा फटका मंडळांनाही बसणार आहे. चित्र शाळांनाही जीएसटीचा फटका बसणार आहे.
-अनंत नाईक, मूर्तिकार, गणेश चित्रशाळा, दारावे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही माती व इतर साहित्यामध्ये २० ते ४० टक्के वाढ झाल्याने मूर्तीच्या किमती ही वाढतील. याशिवाय कारागिरांच्या मजुरीतही वाढ झाली आहे. त्यामुळे मूर्तीच्या किमती वाढणार आहेत. 
- रोहिदास पाटील,  गणेश कला निकेतन, घणसोली.

Web Title: thane news GST ganpati