'आंतरराष्ट्रीय' फोन कॉल 'लोकल' करणारी टोळी उध्वस्त

'आंतरराष्ट्रीय' फोन कॉल 'लोकल' करणारी टोळी उध्वस्त
'आंतरराष्ट्रीय' फोन कॉल 'लोकल' करणारी टोळी उध्वस्त

भिवंडीतील चौदा अनधिकृत टेलिफोन एक्सेंजवर पोलिसांची कारवाई

ठाणे: परदेशात लपून बसून तेथून मुंबई-ठाण्यातील बांधकाम व्यवसायिक आणि व्यापाऱ्यांना खंडणीसाठी फोनवरून धमकावणाऱ्या गुन्हेगारांच्या धमक्या देण्याचा मार्ग असलेल्या अनधिकृत टेलिफोन एक्सेंजवर ठाणे पोलिसांनी मंगळवारी धडक कारवाई केली. ठाणे पोलिसांच्या पथकाने मंगळवारी दिवसभरात 30 ठिकाणी छापे मारून त्यातून 14 बोगस टेलिफोन एक्स्चेंजचा पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 30 जणांना ताब्यात घेतले असून, त्यापैकी 9 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 21 लाख 61 हजार 100 रुपयांचे तांत्रिक मदतीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. गुन्हे शाखा युनिट दोन भिवंडीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शितल राऊत यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस आयुक्त मुकुंद हातोटे व एन.टी.कदम यांनी दहा अधिकारी आणि शंभर कर्मचाऱ्यांच्या पथकाची निर्मिती करून ही कारवाई पुर्ण केली, अशी माहिती सह पोलिस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी दिली.

अंबरनाथ मधील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये बांधकाम व्यवसायिक असलेल्या एका विकसकाला सुरेश पुजारे याचा जुलै 2017 रोजी धमकीचा फोन आला होता. या प्रकरणी खंडणी विरोधी पथक आणि गुन्हे शाखेच्या पथकांकडून तपास सुरू असताना उडीसा येथून हा फोन आल्याची माहिती समोर आली होती. या माहितीच्या आधारे ठाणे पोलिस आणि उडीसा पोलिस यांनी या भागात संयुक्त कारवाई केली असता तेथे एक बोगस टेलिफोन एक्स्चेंज सुरू असल्याची माहिती उघड झाली होती. परदेशातून आलेले फोन लोकल असल्याचे भासवून ते कॉल त्या व्यक्तीपर्यंत पोहचवले जात होते. या प्रकरानंतर ठाणे पोलिसांनी अशाच प्रकारे भिवंडीमध्येही बोगस टेलिफोन एक्सचेंज सुरू असल्याचे समोर आल्यानंतर या भागामध्ये पोलिसांनी कडक बंदोबस्त तसेच संशयितांवर नजर ठेवण्यास सुरूवात केली. त्यानंतर मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी या आरोपींच्या घरावर धाडी टाकून त्यांच्याकडील मुद्देमाल हस्तगत केला. तीस ठिकाणापैकी 14 ठिकाणी बोगस टेलिफोन एक्स्चेंज सुरू असल्याचे समोर आले आहे. पोलिस आयुक्त परम बीर सिंह यांच्या आदेशावरून अप्पर पोलिस आयुक्त मकरंद रानडे, पोलिस उप आयुक्त अभिषेक त्रिमुखे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक नितीन ठाकरे, शितल राऊत, यशवंत चव्हाण यांच्यासह पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.  

अल्पशिक्षित अटक आरोपी...
भिवंडी येथून अटक करण्यात आलेले नऊही आरोपी मुळचे उत्तप्रदेश येथील राहणारे असून ते कुटुंबासह भिवंडीत राहत होते. घरामध्येच त्यांनी टेलीफोन एक्स्चेंजची यंत्रणा उभारली होती. यामध्ये नियाज अहमद शेख (49), मोहंमद शाकिर मोमीन (25), नदिम अली शेख (28), महंमद उमर खान (24), महंमद अर्शद शेख (35), महंमद फुजैल शेख (28), समशाद अन्सारी (26), फकेआलम महंमद शेख (29), महंमद आलीम शेख (28) असे अटक आरोपींची नावे आहे. हे आरोपी अल्पशिक्षित असून पाचवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले आहेत. या प्रत्येकाची महिन्याची कमाई 35 ते 40 हजार रुपयांपर्यंत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.     

अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजचे गौडबंगाल...
ठाणे पोलिसांच्या भिवंडी गुन्हे युनिटने मे 2017 रोजी अशाच प्रकारची कारवाई करून 22 सिमबॉक्स व 420 सिमकार्ड जप्त केले होते. भिवंडी परिसरातील सुरू असलेले चार टेलिफोन एक्स्चेंज उध्वस्त करून 11 आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. त्यानंतरही हा उद्योग सुरू असल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी पुन्हा कारवाई केली. खाजगी टेक्नीशियन व इंटरनेट प्रोव्हायडरच्या मदतीने या अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजवर 15 दिवस पाळत ठेवण्यात आली होती. तर 30 संशयित समोर आले होते. त्यानंतर मंगळवारी कारवाई करण्यात आली. या छाप्यामध्ये 25 सिम बॉक्स, 438 रिलायन्स, एअरटेल, बि.एस.एन.एल, टेलेनॉर, आयडीया या कंपन्यांचे सिमकार्ड, लॅपटॉप, मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहे.

सुरक्षा यंत्रणांच्या नजर चुकवण्यासाठी शक्कल...
परदेशातून येणाऱ्या प्रत्येक फोनवर भारत सरकारच्या टेलीकम्युनिकेशन विभागाचे नियंत्रण असल्यामुळे सुरक्षा यंत्रणांची या कॉल्सची व्यवस्थित माहिती मिळत असते. तसेच हे कॉल सुरक्षा यंत्रणा तपासूही शकतात. परंतु, अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजच्या माध्यमातून आलेले कॉल लोकल असल्याचे भासत असल्यामुळे सुरक्षा यंत्रणांना त्याची माहिती मिळताना अडचण येते. त्याचा गैरफायदा घेऊन अनेक देशविघात कृत्य, गुन्हेगारी कारणांसाठी या टेलिफोन एक्स्चेंजचा वापर केला जातो. तसेच परदेशातून येणारे फोन हे आंतरराष्ट्रीय 'गेट-वे'च्या माध्यमातून भारतातील सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडे येत असून त्यांच्याकडून ग्राहकाच्या फोनवर कॉल येतो. त्यासाठी भारत सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागालाही कर भरावा लागत असून या पध्दतीमुळे कराची रक्कमही चुकली जात होती. या प्रकरणाची माहिती ठाणे पोलिसांनी टेलिकम्युनिकेशन विभागाला दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com