बेकायदा फेरीवाले पोलिसांच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

कल्याण - कल्याण-पश्‍चिम रेल्वेस्थानकाजवळ स्कायवॉकवर बेकायदा बसणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात रेल्वे सुरक्षा बल, पालिका आणि महात्मा फुले पोलिसांनी धडक कारवाई केली. लाखोंच्या मुद्देमालासह १५ फेरीवाल्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

कल्याण - कल्याण-पश्‍चिम रेल्वेस्थानकाजवळ स्कायवॉकवर बेकायदा बसणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात रेल्वे सुरक्षा बल, पालिका आणि महात्मा फुले पोलिसांनी धडक कारवाई केली. लाखोंच्या मुद्देमालासह १५ फेरीवाल्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

कल्याण रेल्वेस्थानकात जाणाऱ्या प्रवाशांसाठी काही वर्षांपूर्वी स्कायवॉक बांधण्यात आला; मात्र त्यावर फेरीवाल्यांनीच बेकायदा व्यवसाय सुरू केला. याचा प्रवाशांना त्रास होत असल्याने नागरिक, लोकप्रतिनिधींकडून आलेल्या तक्रारींनंतर पालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्या आदेशनुसार पालिकेचे क प्रभाग क्षेत्र अधिकारी विनय कुलकर्णी, महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पोवार आणि कल्याण रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने आज दुपारी तीननंतर फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू केली. अचानक कारवाई झाल्याने फेरीवाल्यांची धावपळ झाली. कारवाईत लाखोंचा माल जप्त केला असून १५ फेरीवाल्यांना ताब्यात घेतल्याची माहिती पोवार यांनी दिली.

प्लास्टिक बंदीसाठी गांधीगिरी
कल्याण - कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात प्लास्टिक बंदीवर कारवाई करताना पालिकेचे ‘क’ प्रभाग क्षेत्र अधिकारी विनय कुलकर्णी यांनी चक्क गांधीगिरीचा मार्ग स्वीकारला. शहराच्या मुख्य बाजारपेठेत कारवाईला जाताना त्यांनी चक्क व्यापाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन प्लास्टिक बंदीचे आवाहन केले. १५ जुलैपासून पालिका क्षेत्रात प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. त्यानंतर प्लास्टिक वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर, भाजी विक्रेते, फेरीवाले यांच्यावर प्रभाग स्तरावर कारवाई सुरू आहे. आतापर्यंत पालिकेने दंडाच्या रूपात साठ हजार रुपये वसूल केले आहेत. केवळ धडक कारवाई न करता पालिकेच्या मोहिमेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळावा, यासाठी गांधीगिरीचा अवलंब झाला आहे. 

स्कायवॉक आणि स्थानक परिसर फेरीवालामुक्त करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिल्यानुसार आज दुपारी कारवाई केली. ती पुढेही सुरू राहणार असून पोलिसांनी काही फेरीवाल्यांना ताब्यात घेतले आहे. 
-  विनय कुलकर्णी, क प्रभाग क्षेत्र अधिकारी, पालिका

आमदारांच्या भेटीनंतर कारवाई
स्कायवॉक फेरीवालामुक्त करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी दौरा केला होता. या वेळी त्यांनी पावसाळी अधिवेशनात अधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग आणू, असा इशारा दिला होता. त्यानंतरही फेरीवाल्यांचे बस्तान कायम होते. आज पवार यांनी ठाणे पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांची भेट घेऊन समस्या मांडली. त्यांनी हक्कभंग आणणार असल्याचे स्पष्ट करताच पोलिस आयुक्त यांच्या आदेशानंतर सूत्रे हलली. दरम्यान २४ जुलैला सुरू होणाऱ्या अधिवेशनात हक्कभंग आणणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

Web Title: thane news kdmc Hawkers