बेशुद्ध करून मुलीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

ठाणे - खासगी शिकवणीहून घरी निघालेल्या 17 वर्षांच्या शालेय मुलीला बोलण्यात गुंतवून रुमालाने गुंगीचे औषध लावत निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्‍कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना एक नोव्हेंबर 2017 रोजी मानपाडा येथील गुरुकुल शाळेच्या गल्लीत घडली. या घटनेने घाबरलेल्या मुलीने हा प्रकार कुणाला सांगितला नाही; मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे केलेल्या वैद्यकीय तपासणीत पीडित विद्यार्थिनी गर्भवती असल्याचे निदान झाल्याने या अत्याचाराला वाचा फुटली. त्यानुसार याप्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी 20 ते 22 वर्षे वयोगटातील अज्ञात तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

मानपाडा परिसरात राहणाऱ्या या विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार, ती एक नोव्हेंबरला घराजवळील खासगी शिकवणीसाठी गेली होती. त्या वेळी अज्ञात तरुणाने वेळ विचारण्याच्या बहाण्याने तिच्याशी संवाद साधला. त्यानंतर तिला रुमालाने गुंगीचे औषध लावले. तसेच नजीकच्या गल्लीत नेऊन अतिप्रसंग केला. तिने घाबरून हा प्रकार कुणालाही सांगितला नाही; मात्र 12 फेब्रुवारीला मानपाडा येथील डॉक्‍टरकडे वैद्यकीय तपासणीसाठी तिला नेण्यात आले. त्या वेळी तपासणीत विद्यार्थिनी गर्भवती असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार मुलीला त्वरित उपचारासाठी कळव्याच्या छत्रपती शिवाजी रुग्णालय येथे दाखल केले. याप्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात बाललैंगिक शोषणांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: thane news mumbai news atrocity girl crime