पार्किंग झोनमधील वाहनांनाही टोईंग 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

ठाणे - पे अँड पार्किंगच्या जागेत उभ्या केलेल्या वाहनांवरही ठाणे वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात असल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. पार्किंगचा फलक पाहून उभी केलेली वाहनेही वाहतूक पोलिस उचलत आहेत; तसेच त्यांना जामर लावून अडवून धरली जात आहेत. या प्रकरणी जाब विचारणाऱ्या प्रवाशांना हे फलक पालिकेने लावले असून या भागामध्ये कोणत्याही प्रकारची पार्किंग नसल्याचा दावा वाहतूक पोलिस करत आहेत. यातून महापालिका आणि वाहतूक पोलिसांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे समोर आले आहे. 

पार्किंगची अपुरी व्यवस्था असल्याने शहरांमधील रस्त्यावर ठाणे महापालिकेकडून पार्किंगचे पट्टे आखण्यात आले आहेत. काही ठिकाणी पार्किंग आणि नो पार्किंग; तर काही ठिकाणी पे ऍण्ड पार्किंगचे बोर्ड लावले आहेत. येथे वाहने उभी केल्यानंतरही त्या वाहनांवर कारवाई केली जात असल्याने नागरिक आश्‍चर्य व्यक्त करत आहेत. याबाबत वाहतूक पोलिसांकडे विचारणा केली असता, नो पार्किंगमध्ये वाहने उभी केल्याचा दावा पोलिस करत आहेत. 

वाहनचालकांनी पे अँड पार्किंगचा बोर्ड दाखवल्यानंतर पावतीची विचारणा पोलिसांकडून होत आहे. पालिकेनेही केवळ फलक लावले असून पैसे घेण्याची व्यवस्थाच केली नसल्याने पावती आणायची कुठून, असा प्रश्‍न वाहनचालकांना पडत आहे. काही ठिकाणी पे ऍण्ड पार्किंग आणि नो पार्किंग अशा दोन्ही फलकांचे दर्शन नागरिकांना होत असल्याने संभ्रम निर्माण होत आहे. 

अधिसूचनेपूर्वीच पालिकेचे फलक 
ठाणे महापालिकेतर्फे शहरात पार्किंग पॉलिसी राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावरील नागरिकांच्या सूचना आणि हस्तक्षेप जाणून घेण्यापूर्वीच पालिकेने शहराच्या विविध भागांमध्ये पे ऍण्ड पार्किंगचे फलक लावल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पार्किंग झोनविषयी अद्याप कोणतीही अधिसूचना पोलिसांनी काढली नसून पुढील महिनाभरामध्ये हे काम पूर्ण होईल. त्या वेळी यातील काही बोर्ड काढले जातील, तर काही तसेच ठेवण्यात येतील, असे ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त संदीप पालवे यांनी सांगितले. 

ठाणे महापालिकेने फलक लावले; परंतु पोलिसांनी अधिसूचना काढली नाही. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. पोलिस आणि महापालिकेतील समन्वयाचा अभाव यामुळे समोर आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून हा प्रश्न सोडवण्याची गरज आहे. 
- भूषण पाटील, वाहनचालक

Web Title: thane news parking zone police