प्लास्टिकबंदी संभ्रमावस्थेत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

ठाणे - प्लास्टिकबंदीचा जोर आता हळूहळू ओसरू लागला आहे. एवढेच नव्हे, तर सुरुवातीच्या दिवसात प्लास्टिकबंदीनंतर कारवाईचे आकडे हिरहिरीने देणाऱ्या महापालिका प्रशासनाकडून सध्या या आकडेवारीची मागणी केली असता, वेळकाढूपणा केला जात आहे. प्लास्टिकबंदी लागू झाल्यानंतरच्या पहिल्या दोन दिवसांत पालिकेने जोरदार कारवाई केली होती. सुमारे दीड लाखाचा दंड वसूल करण्यात आला होता. या वेळी प्रामुख्याने दुकानदारांवर कारवाई केली होती.

ठाणे - प्लास्टिकबंदीचा जोर आता हळूहळू ओसरू लागला आहे. एवढेच नव्हे, तर सुरुवातीच्या दिवसात प्लास्टिकबंदीनंतर कारवाईचे आकडे हिरहिरीने देणाऱ्या महापालिका प्रशासनाकडून सध्या या आकडेवारीची मागणी केली असता, वेळकाढूपणा केला जात आहे. प्लास्टिकबंदी लागू झाल्यानंतरच्या पहिल्या दोन दिवसांत पालिकेने जोरदार कारवाई केली होती. सुमारे दीड लाखाचा दंड वसूल करण्यात आला होता. या वेळी प्रामुख्याने दुकानदारांवर कारवाई केली होती. त्यानंतर पालिकेने प्लास्टिक बंदीविरोधात जनजागृतीवर भर दिला जात असल्याचा दावा केला; पण ही जनजागृती कोणकोणत्या माध्यमातून केली जात आहे, याची माहिती देणे मात्र महापालिका प्रशासनाने टाळले आहे. 

प्लास्टिकबंदी लागू झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात सुरू करण्यात आलेली जोरदार कारवाई त्यानंतर थंडावल्याचे दिसत आहे. त्यामुळेच काही उच्चभ्रू वस्तीचा अपवाद वगळता अनेक वस्तीमध्ये रहिवाशांकडून नेहमीच्या वापरासाठी प्लास्टिक पिशवीचा वापर सर्रास होताना दिसत आहे. मूळात प्लास्टिकबंदीचा त्रास थेट नागरिकांना न होता त्यांच्यामध्ये जनजागृती होण्यासाठी प्रयत्न करणे महापालिकेकडून अपेक्षित आहे; पण प्लास्टिकबंदी होण्याच्या पूर्वी प्रदूषण मंडळांकडून विविध स्तरावर जागरूकता येण्यासाठी शहरात जाहिरातीच्या माध्यमातून नागरिकांना प्लास्टिकच्या वापरापासून दूर राहण्याचे आवाहन केले जात होते. यामध्ये आता खंड पडल्याचे दिसत आहे. 

जांभळी नाका येथे सकाळच्या वेळेत घाऊक पद्धतीने भाजीविक्री केली जाते. या ठिकाणी शहरातून सकाळी 6 ते 9 या वेळेत शेकडो नागरिक भाजी खरेदीसाठी येतात. येथेही काही भाजीविक्रेत्यांचा अपवाद वगळता अनेक भाजीविक्रेत्यांकडून ग्राहकांसाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू असतो. नऊनंतर या परिसरातील कचऱ्यामध्ये उरलेल्या भाजीबरोबर प्लास्टिकच्या पिशव्यांचाही खच पडलेला असतो. अशा वेळी किमान सकाळच्या वेळेत या परिसरात गस्त ठेवणे आवश्‍यक आहे. राज्य स्तरावरून प्लास्टिकबंदीचे अनेक नियम शिथिल केल्यानंतर सध्या केवळ घाऊक बाजारातील प्लास्टिक पिशव्यांच्या विक्रेत्यांपुरती प्लास्टिकबंदी अमलात आणली जात असल्याचे चित्र आहे. 

सर्रास प्लास्टिकचा वापर 
प्लास्टिकबंदीचा जोर ओसरू लागल्याचे पाहून अनेक लहान व्यावसायिकांनी पुन्हा एकदा प्लास्टिक पिशव्यांची कास धरली आहे. काही प्रसिद्ध पोळीभाजी केंद्र अथवा उपाहारगृहात प्लास्टिकला बंदी केली आहे; पण कित्येक ठिकाणी लहान स्टॉल्स अथवा दुकानदारांकडून प्लास्टिकचा वापर सुरू आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये सामान देण्यापूर्वी ग्राहक महापालिकेचा कर्मचारी तर नाही ना, याचीही खातरजमा केली जात आहे. 

कारवाईही झाली कमी 
प्लास्टिकबंदीच्या पहिल्या दिवशी 23 जूनला 2 हजार 530 किलो प्लास्टिक जप्त करून 95 हजारांचा दंड वसूल केला होता. त्यानंतर कारवाई कमी होत गेली असून 27 जूनला 220 किलो प्लास्टिक जप्त करून 25 हजार रुपये दंडवसुली केली. 

Web Title: thane news Plastic ban