गुन्हेगारांसाठी दत्तक योजना

श्रीकांत सावंत
शनिवार, 29 जुलै 2017

ठाणे - ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या परिसरातील गुन्हेगारी वृत्तीवर वचक ठेवण्यासाठी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांसाठी गुन्हेगार दत्तक योजना सुरू केली आहे. प्रत्येक गुन्हेगारामागे एक पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. एकीकडे गुन्हेगारांवर नजर ठेवली जात असताना दुसरीकडे नव्याने या क्षेत्रात येण्याचा प्रयत्न करत असलेल्या गुंड प्रवृत्तीलाही आळा बसवण्यासाठी पोलिसांची मोर्चेबांधणी सुरू आहे. नागरिकांनी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीबद्दल थेट पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

ठाणे शहरात मागील दोन महिन्यांत रिक्षाचालकांकडून महिला प्रवाशांवर अतिप्रसंग आणि विनयभंगाचे प्रकार समोर आले होते. कोणतीही गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसलेल्या या आरोपींना शोधताना पोलिसांची मोठी दमछाक झाली होती. शहरातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून असे प्रकार सर्रास होत असताना नागरिकांकडून त्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाल्यास पोलिसांना अशा गुंड प्रवृत्तीवर लक्ष ठेवणे सोपे जाऊ शकते. त्यासाठी ठाणे पोलिसांनी गुन्हेगारांविषयीची माहिती देण्याचे आवाहन केले आहे. ठाणे पोलिस आयुक्त परमबीर सिंग आणि सहपोलिस आयुक्त मधुकर पाण्डे यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली. शहरात प्रत्येक अट्टल गुन्हेगारासाठी एक पोलिस कर्मचारी अशा प्रकारची गुन्हेगार दत्तक योजना सुरू करण्यात आली आहे. गुन्हेगारांच्या टॉप टेन, टॉप थर्टिन याद्या तयार करून त्यावर पोलिसांनी नजर ठेवली आहे. अदखलपात्र गुन्ह्यामध्ये नाव असलेल्या व्यक्तींवरही पोलिसांनी लक्ष ठेवले असून या वेळी नव्याने दाखल होणाऱ्या गुन्हेगारी वृत्तीवरही कडक नजर ठेवण्यात येत आहे. 

शहरात अनावश्‍यक वर्चस्वाचा वाद, टपरीवर उभे राहणे, गुन्हेगारी क्षेत्रात अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न, रिक्षाचालकांना धमकावणे, हॉटेल-बारमध्ये धमकावून फुकट खाणे, खंडणी गोळा करणे, शाळा महाविद्यालयांबाहेर मुली-महिलांना त्रास देणे, व्हॉट्‌सॲपवरून दहशत पसरवणे अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष आहे. ट्युशन क्‍लासची ठिकाणे, घरफोडीची ठिकाणे, वृद्ध राहत असलेल्या भागात पोलिसांचे पायी पेट्रोलिंग सुरू आहे. यातून नागरिकांशी सुसंवाद साधून त्यांना पोलिसांपर्यंत थेट माहिती पोहचवण्यासाठी उद्युक्त केले जात आहे.

-डॉ. डी. एस. स्वामी,  पोलिस उपायुक्त, ठाणे

Web Title: thane news police Adoption scheme