ऐन गटारीत येऊरवर शुकशुकाट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

ठाणे - जंगलात जाणारे तरुणांचे जथेच्या जथे, गाड्यांत मद्याचा साठा, सोबतीला वाहनांमधील डीजेचा सूर आणि ठाण्यातील दादा-भाई लोकप्रतिनिधींच्या नावाने वन विभागाच्या नाकावर टिचुन जंगलात मुक्त प्रवेश करणारी तरुणाई. गटारीच्या दिवशी येऊरच्या प्रवेशद्वारावर नेहमीच ठरलेले हे दृश्‍य यंदा पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे पूर्णपणे बदलून गेले. 

ठाणे - जंगलात जाणारे तरुणांचे जथेच्या जथे, गाड्यांत मद्याचा साठा, सोबतीला वाहनांमधील डीजेचा सूर आणि ठाण्यातील दादा-भाई लोकप्रतिनिधींच्या नावाने वन विभागाच्या नाकावर टिचुन जंगलात मुक्त प्रवेश करणारी तरुणाई. गटारीच्या दिवशी येऊरच्या प्रवेशद्वारावर नेहमीच ठरलेले हे दृश्‍य यंदा पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे पूर्णपणे बदलून गेले. 

येऊरमधील गटारी बहाद्दरांच्या सर्व ठिकाणी यंदा शुकशुकाट असल्यामुळे अनेक वर्षांपासून गटारीच्या निमित्ताने येऊरमध्ये होणारा धुडगूस थांबल्याचे  दिसले.  निसर्ग आणि पर्यावरणासाठी झटणाऱ्या येऊर एन्व्हायर्न्मेंट सोसायटी संस्थेच्या तीन वर्षांच्या ‘ग्रीन गटारी’ उपक्रमामुळे हे चित्र बदलले असून, या भागातील ९० टक्‍क्‍यांहून अधिक पार्ट्या बंद झाल्याचे उपक्रमाचे समन्वयक रोहित जोशी यांनी सांगितले. 

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर परिसरातील नैसर्गिक धबधबे, जंगल आणि उद्यानातील एकांताची ठिकाणे काबीज करून तेथे दारू आणि गटारी पार्ट्या झोडणाऱ्या मंडळींना यंदा ठाणे पोलिसांनी चांगलाच दणका दिला. गटारीच्या एक दिवस आधीपासूनच पोलिसांनी येऊरच्या प्रवेशद्वारावर कडक बंदोबस्त ठेवून तेथे तपासणी सुरू केल्यामुळे यंदा येऊरचा परिसर मद्यपींच्या उपद्रवापासून मुक्त झाल्याचे दिसले. 

दर वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ९० टक्‍क्‍यापर्यंत कमी झाले असून, या भागातील काही बंगल्यांमध्ये आणि रिसॉर्टमध्ये गेलेल्यांच्या पार्ट्या मात्र सुरू होत्या; परंतु जंगलात दारू पिणे, मोठ्याने वाद्य वाजवणे, कारचे म्युझिक सिस्टीम लावून धुडघूस घालण्याचा प्रकार पूर्णपणे बंद झाला होता. येऊर एन्व्हायर्न्मेंट सोसायटीतर्फे या भागात ग्रीन गटारीच्या निमित्ताने जनजागृती सुरू करण्यासाठी रविवारी सकाळी संस्थेचे ४० जण या ठिकाणी पोहचले; परंतु रात्रीपासूनच या भागात पोलिसांचा कडक पहारा सुरू होता. 

येऊर एन्व्हायर्न्मेंट सोसायटीबरोबरीने ‘ठाणेकर’ आणि मतदान जागरण सोसायटी संस्थेच्या ४० स्वयंसेवकांनी या भागात जनजागृती सुरू केली. केवळ हौशी पर्यटक, काही कुटुंबीय या भागामध्ये फिरण्यासाठी आल्याचे दिसले. पोलिसांकडून प्रमुख प्रवेशद्वारावर तपासणी सुरू असल्यामुळे अनेक मंडळींनी पोलिसांना पाहताच तेथून पाठ फिरवून गाड्या वळवल्या. वन विभागाचे कर्मचारीही रात्री पासून जंगलात तळ ठोकून होते. त्यांच्याकडून तपास सुरू असल्यामुळे यंदा पहिल्यांदाच मद्यपींच्या धुडगुसापासून सुटका झाल्याचा अनुभव रहिवाशांनी घेतला.

मद्य पिऊन बाटल्या फोडणारे गायब    
येऊरचे जंगल संरक्षित वनक्षेत्र असतानाही या भागात येऊन मद्य प्राशन करून त्या बाटल्या तिथेच फोडून टाकल्या जात होत्या. त्यामुळे येऊरमध्ये काचांचा खच तयार होऊन येथील आदिवासींच्या पायाला जखमा होत होत्या. यंदा मद्य पिऊन बाटल्या फोडणारे नसल्यामुळे काचांचे प्रमाण कमी झाले होते; परंतु केवळ गटारीपुरते हे मर्यादित न ठेवता कायमस्वरूपी हा बंदोबस्त सुरू ठेवल्यास निसर्गाचे संरक्षण होईल. पोलिसांची तपास यंत्रणा आक्रमकपणे काम करत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी या भागात तपासणी करताना कुठेच दिसून आले नाहीत, असे येऊर एन्व्हायर्न्मेंटल सोसायटीचे समन्वयक रोहित जोशी यांनी सांगितले.

येऊरच्या सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेला धुडगूस आणि मद्यपींचा धिंगाणा याच्याविरुद्ध तक्रारी येत होत्या. त्यानुसार दोन पोलिस निरीक्षक, दोन सहायक पोलिस निरीक्षक, २५ कर्मचारी आणि दोन वायरलेस व्हेईकल असा बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांनी या सर्वांवर कारवाई केली असून, त्याला चांगले यश मिळाले आहे.
- प्रदीप गिरीधर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वर्तकनगर पोलिस ठाणे

Web Title: thane news police security