वरुणराजाने धो धो धुतले...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

ठाणे - जून महिन्याचे तीन आठवडे उलटल्यानंतही तुरळक हजेरी लावणारा मॉन्सून शनिवारी रात्री ठाणे जिल्ह्यात जोरदार सक्रिय झाला. एका रात्रीत सुमारे २०४ मिलिमीटर पावसाने हजेरी लावल्यामुळे ठाण्यासह कल्याण-डोंबिवली व भिवंडी या शहरांना मोठा फटका बसला. शहरात ठिकठिकाणी वृक्षांची पडझड, तर काही ठिकाणी इमारतींच्या तळमजल्यात पाणी साचले. ठाणे, कळवा, मुंब्रा व दिव्यात पाणी साचल्याने हाहाकार माजला होता. अनेक घरांत साचलेल्या पाण्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले; तर शहरातील महत्त्वाच्या व्यापारी केंद्र असलेल्या राममारुती रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

ठाणे - जून महिन्याचे तीन आठवडे उलटल्यानंतही तुरळक हजेरी लावणारा मॉन्सून शनिवारी रात्री ठाणे जिल्ह्यात जोरदार सक्रिय झाला. एका रात्रीत सुमारे २०४ मिलिमीटर पावसाने हजेरी लावल्यामुळे ठाण्यासह कल्याण-डोंबिवली व भिवंडी या शहरांना मोठा फटका बसला. शहरात ठिकठिकाणी वृक्षांची पडझड, तर काही ठिकाणी इमारतींच्या तळमजल्यात पाणी साचले. ठाणे, कळवा, मुंब्रा व दिव्यात पाणी साचल्याने हाहाकार माजला होता. अनेक घरांत साचलेल्या पाण्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले; तर शहरातील महत्त्वाच्या व्यापारी केंद्र असलेल्या राममारुती रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. काही दुकानांतही पाणी घुसले होते. शहरातील वाहतूक पूर्णपणे खोळंबली. ठाणे रेल्वेस्थानक परिसरात साचलेल्या पाण्यामुळे सकाळपासूनच रेल्वे सेवा विस्कळित झाली होती. 

ठाणे शहरात शनिवार रात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे ठाणे शहरामध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. अतिवृष्टीमुळे शहरातील बहुतांश रस्ते, दुकाने, इमारती, व्यापारी केंद्रे जलमय झाली. खाडीकिनारा आणि उथळ भागातील घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. शनिवारी रात्रीच्या पावसामुळे मुंब्रा, कौसा भागांमध्ये अनेक भागांतील घरांमध्ये पाणी गेल्यामुळे नागरिकांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागली. घरांमध्ये शिरलेले पाणी काढण्यामध्ये नागरिकांचा बराच वेळ जात होता. मुंब्रा बाजारपेठही पावसाच्या पाण्याखाली गेली होती. ठाणे बाजारपेठेमध्येही पाणी असल्यामुळे रविवारी शहरातील दुकानेही बंद होती. दिवसभर पावसाने उघडीप दिल्यामुळे हळूहळू पाण्याचा निचरा होऊन परिस्थिती नियंत्रणात आली.  

संरक्षक भिंत कोसळली    
ठाण्यातील मुल्ला बाग भागातील निलकंठ ग्रीन्स या इमारतीच्या पार्किंगजवळील ठाणे महापालिकेची संरक्षक भिंत कोसळून मोठ्या प्रमाणात पाणी इमारतीच्या पार्किंगमध्ये घुसले. या भिंतीचा काही भाग इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन गाड्यांवर कोसळल्यामुळे अजित पटवर्धन व विजय गार्गे यांच्या गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने दिली. ठाणे शहरात ठिकठिकाणी साचलेले पाणी काढण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते; परंतु नालेसफाईमधील दुर्लक्षामुळे शहराच्या विविध भागांत पाणी साचून नुकसान झाले. 

वृक्ष कोसळून कार, घरांचे नुकसान
शनिवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने विविध ठिकाणी झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यामध्ये तीन हात नाक्‍याजवळील इटर्निटी मॉल परिसरात एक झाड कारवर कोसळून कारचे नुकसान झाले; तर वागळे इस्टेट येथील इंदिरा नगर भागातील समुद्दीन अन्सारी यांच्या झोपडीवर वृक्ष कोसळून झोपडीचे नुकसान झाले. वागळे इस्टेट येथील आनंदधाम सोसायटी, ब्रह्मांड भागातील ऐश्‍वर्या फ्लोअर सोसायटी परिसरात फांदी कोसळली. जिल्हाधिकारी कार्यालयामोरील जिल्हा न्यायालयाजवळ झाड कोसळले. गोकुळ नगर येथेल खर्डीकर यांच्या घरावर झाडाची फांदी कोसळून नुकसान झाले. कळवा खारीगाव मनीषा नगर या परिसरातही झाडाच्या फांद्या कोसळल्याच्या घटना घडला. पोखरण रोडवरही झाड कोसळले. या प्रकारांमुळे काही घरांचे नुकसान झाले; तर रस्त्यावर कोसळलेल्या वृक्षामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

Web Title: thane news rain