पहिल्या पावसात दिवा-मुंब्रा तुंबले!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

ठाणे - ठाणे महापालिकेचा नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा शुक्रवारी (ता. ९) रात्रीपासून सुरू झालेल्या पहिल्या पावसातच फोल ठरला. शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याचे चित्र दिसून येत होते. दिवा आणि मुंब्रा या ठाण्यातील दुर्लक्षित विभागांमध्ये तर नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसल्याने या परिसरातील जनजीवन विस्कळित झाले होते.

ठाणे - ठाणे महापालिकेचा नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा शुक्रवारी (ता. ९) रात्रीपासून सुरू झालेल्या पहिल्या पावसातच फोल ठरला. शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याचे चित्र दिसून येत होते. दिवा आणि मुंब्रा या ठाण्यातील दुर्लक्षित विभागांमध्ये तर नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसल्याने या परिसरातील जनजीवन विस्कळित झाले होते.

दिवा-मुंब्रा या दाट वस्तीच्या भागामध्ये कोणत्याही यंत्रणांशिवाय केलेली नालेसफाई अर्धवट राहिल्याने शहराच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचले होते. दिव्यातील सात ते आठ प्रमुख नाल्यांमध्ये अद्याप नालेसफाईचा मागमूसही नाही. त्यामुळे शहरातील नाल्यामध्ये प्लास्टिक आणि कचऱ्याचा खच दिसून येत आहे, तर शुक्रवारच्या रात्री मुंब्य्रातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. महापालिकेमध्ये ११ नगरसेवक दिलेल्या या भागातील नागरिकांवर रात्री रस्त्यावर येण्याची वेळ आली होती. 

दिवा, मुंब्रा आणि कळवा परिसरातील नाल्यांची स्थिती अत्यंत विदारक आहे. जोरदार पावसात वस्तीतील घरांमध्ये पाणी घुसण्याबरोबरच रेल्वे रुळांवर पाणी साचून वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. पहिल्याच पावसात मुंब्य्रातील केदार पॅलेस, कळव्यातील वाघोबानगर आणि दिव्यातील बराचसा भाग पाण्याखाली गेला होता. कळव्यातील वाघोबानगर परिसरातून रेल्वेची जलद मार्गिका जात असून, त्यामध्ये साचलेल्या कचऱ्यामुळे रेल्वे वाहतूकही खोळंबण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

या भागामध्ये रेल्वे प्रशासन आणि पालिका यांच्यामधील हद्दी आणि जबाबदारीच्या नियोजनाच्या अभावामुळे या परिसरातील नाले कचरा आणि गाळाने भरलेला असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. 

गाळ, कचरा रस्त्यावर...
ठाणे शहरामध्ये नालेसफाई झाल्यानंतर नाल्यातून काढण्यात आलेला गाळ आणि प्लास्टिकचा कचरा काठावर तसाच टाकून देण्यात आला होता. हा कचरा सुकल्यावर उचलला जाणार असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे; परंतु पाऊस सुरू झाल्याने कचरा सुकण्याऐवजी ओला होऊन पुन्हा नाल्यामध्ये जाऊन बसत आहे. त्यामुळे नाल्यातील सगळा कचरा रस्त्यावर येऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर होत आहे. त्यामुळे याविषयी तत्काळ कारवाई करण्याची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते अनिल जैन यांनी व्यक्त केले.

दिव्यात नालेसफाई नव्हे; हातसफाई...
दिवा शहरातील महत्त्वाच्या बेडेकर नाला, वक्रतुंडनगर नाला, तिसाईनगर नाला, मुंब्रा देवी कॉलनी नाला, रिलायन्स टॉवर नाला, ग्लोबल इंग्लिश नाला, दिवाशिळ रोड नाला या महत्त्वाच्या नाल्यांची सफाई झाली नाही. त्यासाठी लागणारे कोणतेही अद्ययावत यंत्रणा व सामग्री या भागात न आणताच नालेसफाई झाल्याचा दावा करण्यात आला आहे. केवळ कामगारांच्या साह्याने येथील नालेसफाई झाली आहे. मुख्य नाले व गटारांमधील गाळ काढण्यात आलेला नाही. शहरात ५० टक्केही नालेसफाई झाली नसल्याचा आरोप दिव्यातील भाजपचे कार्यकर्ते रोहिदास मुंडे यांनी केला आहे.

Web Title: thane news rain tmc