नालेसफाईच्या दाव्याचा ‘सफाया’ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

ठाणे - शनिवारी, रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने नालेसफाईचा बोजवारा उडाल्याचे चित्र ठाण्यात दिसले. शंभर टक्के नालेसफाई झाल्याचा दावा महापालिकेने केला होता; पण ठाण्यात एक, दोन नाही; तर ६१ ठिकाणी पाणी शिरले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याच्या घटना घडल्यानंतर संबंधित ठेकेदार अथवा अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी शिवसेनेने नालेसफाईच्या विषयावर विशेष सभा बोलावण्याचे दिलेले आश्‍वासनही आता हवेत विरल्याचे मानले जात आहे.

ठाण्यातील नालेसफाईवर तब्बल दहा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मुळात एवढ्या मोठ्या प्रमाणात नालेसफाईवर खर्च झाल्याने पाणी तुंबण्याच्या घटनांपासून ठाणेकरांची सुटका होईल, ही आशा फोल ठरली आहे. नालेसफाई झाली नसल्याची ओरड सुरुवातीपासून होत आहे. विरोधकांनी वारंवार या विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तसेच नालेसफाईच्या दाव्यानंतरही नालेसफाईचा बोजवारा उडाल्याचे प्रसारमाध्यमांनीही वारंवार समोर आणले होते; पण डोळ्यावर पांघरूण घेतलेल्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांना या विषयाकडे पाहण्यास वेळ नसल्यानेच ठाणेकरांना पावसात पाण्यात जाण्याची वेळ आली आहे. त्यातही कामात हयगय करणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांना सत्ताधारी शिवसेनेचे पाठबळ मिळाल्याने भविष्यातही पाणी शिरण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

मागील आठवड्यात झालेल्या काही तासांच्या पावसात मुंब्रा आणि कळव्यातील नाले तुंबले होते. त्या वेळीही नालेसफाईच्या कामाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचल्याचे दिसून आले. 

पाणी नक्की मुरले कुठे?
दरवर्षीप्रमाणे वंदना, आराधाना, राममारुती रोड आदींसह शहरातील इतर महत्त्वाच्या भागात पाणी तर साचलेच; परंतु इतर नव्या भागांतही यंदा पाणी साचले होते. नाल्याच्या भोवती मोठ्या प्रमाणात कचरा; तसेच गाळ असल्याचे दिसून येत होते. शहरात १३२ कि.मी. लांबीचे १३ मोठे व ३० छोटे नाले आहेत. नालेसफाईची कामे विविध ६५ ठेकेदारांना देण्यात आली आहेत. या कामांसाठी सुमारे १० कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी शहरातील नाल्यांची सफाई केवळ तीन कोटींमध्ये होत होती. यंदा हा आकडा थेट दहा कोटींवर गेल्यावरही शहरात पाणी शिरल्याने नालेसफाईचे पाणी नक्की मुरले कोठे, हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

Web Title: thane news rain tmc road