रामेश्वरमच्या ‘हाऊस आॅफ कलाम’मध्ये ठाण्याची ‘कल्पकता’

श्रीकांत सावंत
गुरुवार, 27 जुलै 2017

ठाणेकरांच्या कामाची राष्ट्रीय दखल...
​कलाम यांच्या रामेश्वरम येथील घर आणि शाळा पाहण्यासाठी मोठ्याप्रमाणामध्ये देश-विदेशातील संशोधक, विद्यार्थी येतात. त्यांना कलाम यांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी कल्पकता केंद्र तयार करण्यात आले असून तेथे 20 विद्यार्थी बसू प्रयोग करू शकतात. या केंद्रामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक्स, रोबोटिक्स अशा विषयांवरील तीन हजाराहून अधिक प्रयोग मुलांना करता येणार आहेत.

ठाणे : भारताचे माजी दिवंगत राष्ट्रपती भारतरत्न डाॅ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या दुसऱ्या स्मृतीदिना निमित्ताने त्यांच्या रामेश्वरम या जन्मगावी ‘हाऊस आॅफ कलाम’ हे स्मारक खुले केले जात आहे. या स्मारकामध्ये ठाण्यातील ‘चिल्ड्रेन टेक सेंटर’चे ‘कल्पकता केंद्रा’ला मानाचे स्थान देण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये या स्मारकाचे उद्घाटन होत आहे.

ठाणेकरांनी सर्वात पहिल्यांदा डाॅ ए.पी.जे अब्दुल कलाम यांना स्मरणार्थ 'कल्पकता केंद्रा’ची उभारणी केली होती. याची माहिती मिळताच 'डाॅ कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन'च्या सदस्यांनी या केंद्रीची पाहणी केली. त्यानंतर असे केंद्र रामेश्वरम मधील कलाम यांच्या घरामध्ये बनवण्याची संधी ‘चिड्रेन टेक सेंटर’ला देण्यात आली. त्यानंतर अवघ्य़ा दोन महिन्यामध्ये संस्थेचे मिलिंद चौधरी आणि पुरूषोत्तम पाचपांडे यांनी रामेश्वरमध्ये हे ‘कल्पका केंद्र’ साकारले आहे. 

ठाण्यातील ‘चिल्ड्रेन टेक सेंटर’ संस्था मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी कार्यरत असून रोबो लॅब आणि अन्य प्रयोगशिल उपक्रमांच्या माध्यमातून ठाण्याबरोबरच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे. संस्थेतील मुलांनी आत्तापर्यंत नाविण्यपुर्ण प्रकल्प तयार केले असून त्यामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी शाक देणारे सॅन्डल, बोलणारे आकाश कंदिल, प्रसाद वाटणारा उंदीर, सौर उर्जेवर चालणारे आकाशकंदील, घरातील इमारतीवर पाणी भरण्यासाठी विविध कल्पक प्रयोग आणि यांच्यासह अनेक सहज सोप्या पध्दतीने मुलांना विज्ञानाची आवड निर्माण केली. मोबाईल रिचार्ज करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाॅवर बॅंकमध्ये चक्क वाळू भरून वजन वाढवले जात असल्याची धक्कादायक माहिती या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांसमोर आणली होती. संस्थेने 2016 मध्ये ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या स्मारकाच्या निमित्ताने ठाण्यातील कचराळी तलाव परिसरामध्ये  ‘अब्दुल कलाम कल्पकता’ केंद्राची निर्मिती केली. 20 मुले एका ठिकाणी बसुन व्यवस्थित प्रयोग करू शकतात. असे या केंद्राची व्यवस्था असून त्याची माहिती डाॅ कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या सदस्यांना मिळाल्यानंतर त्यांनी  या संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. अब्दुल कलाम यांच्या विचारांना खऱ्या अर्थाने जिवंत ठेवणाऱ्या या उपक्रमाला त्यांच्या जन्मगावी त्यांच्या घरामध्ये तसेच त्यांच्या शाळेमध्ये उभारण्याची संधी संधी ‘चिड्रेन टेक सेंटर’ला देण्यात आली. आणि संस्थेने या संधीचे सोने केले. 

ठाणेकरांच्या कामाची राष्ट्रीय दखल...
कलाम यांच्या रामेश्वरम येथील घर आणि शाळा पाहण्यासाठी मोठ्याप्रमाणामध्ये देश-विदेशातील संशोधक, विद्यार्थी येतात. त्यांना कलाम यांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी कल्पकता केंद्र तयार करण्यात आले असून तेथे 20 विद्यार्थी बसू प्रयोग करू शकतात. या केंद्रामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक्स, रोबोटिक्स अशा विषयांवरील तीन हजाराहून अधिक प्रयोग मुलांना करता येणार आहेत. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या कुटुंबातील त्यांचे नातू ए.पी.जे.एम. शेख सलिम हे या केंद्रात मुलांना माहिती देणार आहे. शिवाय ‘चिड्रेन टेक सेंटर’ या फाऊंडेशनचे महाराष्ट्रातील सहकारी होण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या केंद्राला तांत्रिक साहाय्य पुरवले जाणार असून ही ठाणेकरांच्या कामाची दखल असल्याचे मत संस्थेचे पुरूषोत्तम पाचपांडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: Thane news Rameshwaram House of Kalam