रस्ते चकाचक; पदपथ बकाल

दीपक शेलार
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

ठाणे - ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रस्तारुंदीकरणाचा धडाका लावण्याबरोबरच फेरीवाल्यांवरही कारवाईचा बडगा उगारल्यामुळे ठाण्याचे रूपडे बदलत आहे. एकीकडे रस्ते चकाचक झाले असले, तरी पदपथ मात्र बकाल बनले असून अनेक रस्त्यांच्या कडेला संसार थाटल्याचे चित्र दिसत आहे. सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारणाऱ्या नागरिकांना आणि पादचाऱ्यांना रस्त्यावरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या अपप्रवृत्तीकडून पदपथावर होणाऱ्या भांडण-तंट्यामुळे परिसरातील शांततेचा भंग होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

तलावांचे शहर अशी बिरुदावली मिरवणारे ‘ठाणे’ काही वर्षांत हळूहळू कात टाकत आहे. ठाणे शहराला स्मार्ट सिटी बनवण्याचा ध्यास महापालिकेला लागला असून शहरातील अनेक रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येत आहे. पूर्वी २अनेक रस्त्यांवरील पदपथांवर गॅरेज, फेरीवाले आणि दुकानदारांनी पथाऱ्या पसरल्या होत्या. या सर्वांचे उच्चाटन करून आयुक्त जयस्वाल यांनी प्रभाग समितीनिहाय मॉडेल रस्ते बनवले. 

पदपथांची रंगरंगोटी करून वृक्षलागवडीसह बसण्याची आलिशान आसने बसवून शहराचा चेहरामोहरा बदलला; मात्र मोकळ्या झालेल्या या पदपथांवर सध्या गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांचे वास्तव्य वाढले असून काहींनी या ठिकाणी संसार थाटले आहेत. विशेषतः कोपरी स्टेशन परिसर, नौपाडा-अनिल सोसायटी, तीन हातनाका, गावंड पथ, पोखरण रोड, गावदेवी परिसरातील पदपथ केवळ नावापुरते उरल्याचे दिसत आहे. 

पदपथ मोकळे नसल्याने पादचाऱ्यांना आणि सकाळ-सायंकाळ फेरफटका मारणाऱ्या नागरिकांना येथून मार्गक्रमण करणे कठीण होऊन बसले आहे, अशा तक्रारी वाढल्या आहेत. रोज शहर विकासाच्या नवनव्या संकल्पना राबवणाऱ्या पालिका आयुक्तांनी या पदपथांना पडलेला विळखा सोडवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रस्ते रुंद झाले, पदपथही मोठे झाले; मात्र पदपथांवर राजरोसपणे भिकारी-गर्दुल्ले, सिग्नलवर व्यवसाय करणारे फेरीवाले वास्तव्य करून राहत आहेत. रात्रीच्या वेळी तर गांजा-चरस पिऊन दंगामस्ती केल्याने परिसरातील शांतता भंग पावत असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्या आहेत. त्यानुसार ३१ ऑक्‍टोबरला पालिकेकडे आणि पोलिसांकडे लेखी तक्रारी केल्या आहेत; मात्र अद्याप कारवाई झालेली नसल्याने याविरोधात महासभेत आवाज उठवणार आहे.
- सुनेश जोशी,  स्थानिक भाजप नगरसेवक.

पदपथ अडवणाऱ्यांवर महापालिकेकडून नियमित कारवाई केली जाते, तरीही नागरिक अथवा लोकप्रतिनिधींच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन तीन हात नाका परिसरात कारवाई सुरू करण्यात आली आहे.
- संदीप माळवी, उपायुक्त, पालिका

Web Title: thane news road TMC