रस्ता अडवणारे शोरूम सील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

ठाणे - शहरात रस्तेरुंदीकरण मोहीम राबवण्यात आल्यानंतर ठाणे रेल्वेस्थानक, घोडबंदर परिसरातील अनेक रस्ते रुंद झाले आहेत. या रुंद झालेल्या रस्त्याचा अद्यापही पुरेपूर वापर होत नाही. काल महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रस्त्याच्या वापरासाठी अडथळा ठरणाऱ्या दोन कारच्या शो रूमला थेट सील ठोकले आहे. त्यांच्या या कारवाईमुळे दुकानासमोर गाड्या पार्किंग करणाऱ्या शोरूम चालकांचे धाबे दणाणले आहे.

ग्लॅरी अल्वारीस रोड येथील फोर पॉईंट या मारुती कंपनीच्या आणि घोडबंदर रोड येथील हुंडाई शोरूमला सील ठोकण्यात आले आहे. या शोरूममधील गाड्या सर्रास रस्त्याच्या कडेला पार्क करून ठेवण्यात आल्या होत्या. मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या या गाड्यांमुळे रस्ता मोठ्या प्रमाणात अडवण्यात आला होता. यापूर्वी लेडीज बारविरोधातील कारवाई करतानाच शहरातील शोरूम चालकांना रस्त्यावर त्यांच्या गाड्या पार्क न करण्याबाबत बजावण्यात आले होते. त्यानंतरही अनेक शोरूम चालकांकडून महापालिकेचा रस्त्यावर पार्किंग होत असते.

काल महापालिका आयुक्तांकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्याच्या कामाची स्थिती काय आहे, याची खातरजमा करण्यासाठी पाहणी करण्यात आली. या वेळी पावसाळ्यापूर्वी रस्त्याची कामे पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले; पण त्याच वेळी त्यांना शोरूम चालकांकडून अनेक ठिकाणी रस्ते अडवल्याचे लक्षात आले. त्याची दखल घेऊन त्यांनी महापालिकेच्या रस्त्यांना वेठीला धरणाऱ्या शोरूमला तत्काळ सील ठोकण्याचे आदेश दिले. एवढेच नव्हे; तर या दोन्ही शो रूमला प्रत्येकी दहा लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

शोरूम चालकांसाठी लवकरच नोटीस 
महापालिकेतर्फे रस्ते अडवणाऱ्या शोरूम चालकांसाठी लवकरच जाहीर नोटीस काढण्यात येणार आहे. त्यात रस्ते अडवणाऱ्या शोरूम चालकांवर कोणत्या प्रकारची कारवाई केली जाणार आहे, हे स्पष्ट होणार आहे. शहरातील रस्ते फेरीवाल्यांमुळे अरुंद होत असतानाच या शोरूमच्या गाड्यामुळेही रस्ते अरुंद होत आहेत. अनेक ठिकाणी सेकंडहॅंड गाड्या विकणाऱ्या शोरूमच्या बाहेरील पदपथही ताब्यात घेतला जात असल्याचे दिसते; मात्र यापुढे या गाड्या विक्री करणाऱ्या दुकानचालकांवर केवळ दंडात्मक कारवाईच नाही; तर त्यांची दुकाने थेट सील करण्याची कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

Web Title: thane news showroom seal