गर्दीमुळे बळावला स्वाईन फ्लू

गर्दीमुळे बळावला स्वाईन फ्लू

ठाणे  - मुंबई, ठाणे आणि पुणे ही सर्वाधिक गर्दीची शहरे असल्याने येथे स्वाईन फ्लू बळावल्याचा प्राथमिक निष्कर्ष केंद्रीय पथकाने काढला आहे. हा आजार का बळावला, याचा आढावा घेण्यासाठी दिल्लीवरून आलेल्या डॉक्‍टरांच्या पथकाने गुरुवारी (ता. २९) ठाण्यात पाहणी केली. सरकारी तसेच खासगी रुग्णालयांत स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी काय उपचार केले अथवा कोणती उपाययोजना राबवली, याचा आढावा या पथकाने घेतला असून, या पाहणीचा अहवाल केंद्राला सादर केला जाणार आहे.

ठाण्यात स्वाईन फ्लूने नऊ जणांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यानुसार जिल्ह्यात स्वाईन फ्लूच्या प्रादुर्भावाची कारणे शोधण्यासाठी दिल्लीतील नॅशनल सेंट्रल फॉर डिसीजेस कंट्रोल (एनसीडीसी)कडून पाहणी करण्यात आली. या पथकात दोन सरकारी व दोन खासगी डॉक्‍टरांचा समावेश होता. 

या पथकाने जिल्हा सरकारी रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात भेटी देऊन स्वाईन फ्लूच्या उपचारासाठी काय सुविधा आहेत, याची तपासणी करून आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. या वेळी पथकाने आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांच्या दालनात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. केम्पी पाटील, ठाणे महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. आर. टी. केंद्रे, कळवा रुग्णालयाच्या डीन (अधिष्ठाता) डॉ. संध्या खडसे आणि जिल्ह्यातील सहा महापालिकांच्या आरोग्य अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन स्वाईन फ्लू आजाराचा आढावा घेतला. 

स्वाईन फ्लूबाबत राज्य सरकारच्या उपाययोजना आणि त्याबाबतच्या गाईडलाईन्सची माहिती जाणून घेतली. दरम्यान, एनसीडीसीच्या या पथकाने स्वाईन फ्लूने दगावलेल्या दोन रुग्णांच्या घरी जाऊन कुटुंबीयांशी संवाद साधला.

सर्वाधिक लागण महिलांना
ठाण्यात स्वाईन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण अधिक आहे. आतापर्यंत स्वाईन फ्लूने मृत्यू झालेल्या नऊ मृतांमध्ये आठ महिला असून, लागण झालेल्यांमध्येही महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. जूनमध्ये स्वाईन फ्लूचा प्रसार झपाट्याने वाढून महिन्याभरातच १०५ जणांना या रोगाची लागण झाली, तर मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी सात रुग्ण हे ठाणे महापालिका परिसरामधील असून, दोन रुग्ण हे रायगड आणि डोंबिवली परिसरातील आहेत.

स्वाईन फ्लूने १४ मृत्यू ओढवल्याने मुंबई, ठाणे आणि पुणे जिल्ह्यांत स्वाईन का वाढला, याचा पाहणी दौरा आहे. आता पुणे येथे जाणार असून, त्यानंतरच याबाबतचा विस्तृत अहवाल केंद्राला सादर केला जाणार आहे. 
- डॉ. अशोककुमार सिंग, दिल्लीच्या पथकातील सदस्य

जानेवारी ते जून २०१७ पर्यंत मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या कोकण विभागात स्वाईन फ्लूने १४ रुग्ण दगावले आहेत. हे सर्व मृत्यू जून महिन्यातच झाल्याने केंद्राचे पथक पाहणीसाठी आले. याच कालावधीत आरोग्य विभागाने १ लाख ६४ हजार ६०० रुग्णांची रक्त तपासणी केली. यात २०३ संशयित रुग्णांचे रक्तनमुने चाचणी (स्क्रीनिंग) केल्यानंतर १५३ रुग्ण स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आढळले. त्यानुसार ॲक्‍शन प्लॅन बनवला असून रुग्णांसाठी पुरेसा औषधसाठा आहे.
- डॉ. रत्ना रावखंडे, आरोग्य उपसंचालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com