ठाणे जिल्ह्यातील एसटी स्टॅण्ड बनले गर्दुल्यांचा अड्डा

प्रवीण चव्हाण
गुरुवार, 6 जुलै 2017

पालघर डिव्हिजनल अधिकाऱ्यांच्या आखात्यामधील विषय असून, उदघाटन करण्याबाबत निर्णय आल्यास बस स्थानक सुरू करण्यात येईल, पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन करण्याचे आयोजन वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला होता मात्र काही कारणास्तव रद्द करण्यात आला.
- एम बेहरे, डहाणू आगार प्रमुख

तलासरी (ठाणे): राज्य वाहतूक महामंडळाच्या पालघर विभागामार्फत तलासरी तालुक्‍यात महामार्गालगत एसटी डेपो उभारण्यासाठी सात एकर जागा घेऊन ठेवण्यात आली होती. आदिवासी विकास निधीतून अखेर बस स्टॅण्डसाठी 2013 मध्ये 30 लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्याआधारे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बस स्टॅण्ड इमारतीचे बांधकाम करण्यात आले. नव्या इमारतीची उद्घटनाअभावी दुर्दशा झाली असून, स्टॅण्ड गर्दुल्यांचा अड्डा बनले आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी एसटी स्टॅण्डच्या बांधकामाला सुरवात करण्यात आली होती. मात्र, तलासरी मधील नव्याने उभारण्यात आलेल्या स्टॅण्ड तयार होऊन अडीच वर्षे उलटत आली. मात्र अद्यापही त्याचे उदघाटन करण्यात आले नसल्याने वापराविना पडून आहे. वापर नसल्याने एसटी स्टॅण्ड दुर्दशा झाली असून गर्दुल्ले व तरुणाच्या टोळक्‍यांनी नव्या इमरातीच्या कंट्रोल रूमच्या काचा फोडल्या आहेत तर विजेच्या वायर तोडून टाकण्यात आल्या आहेत. देखरेखी साठी बस स्टॅण्ड इमारतीमध्ये कोणी राहत नसल्याने कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून सकाळ संध्याकाळ गर्दुल्ले, नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तींचा वावर वाढला आहे.

डहाणू आगरातून सोडण्यात येणाऱ्या बस उधवा, तलासरी, उंबरगाव ,सूत्रकार या ठिकाणी मोजक्‍याच फेरी मारत असल्या तरी आदिवासी दुर्गम ग्रामीण भागातील नागरिक व विद्यार्थ्यांना आजही जीव धोक्‍यात घालून खाजगी वाहनांचा आसरा घ्यावा लागत आहे. डहाणू, उंबरगाव, उधवा इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी बसची वाट पाहत नागरिकांना व विद्यार्थ्यांना मुख्य चौकात अथवा उड्डाण पुला खाली ताठकळत उभे रहावे लागते. वर्षानुवर्षं रखडलेले बस स्टॅण्डचे उदघाटनाचा विसर पडलेल्या राज्य वाहतूक महामंडळाने पाठपुरावा करून तातडीने एसटी स्टॅण्ड सुरू केल्यास शालेय विद्यार्थी, तरुण तरुणी, वयोवृद्ध प्रवाश्‍यांना सुखावह वाटेल. स्थानिक आमदार, खासदारांनी वापराविना पडून असलेल्या एसटी स्टॅण्ड बाबत जातीने लक्ष घालून एसटी डेपोच्या प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी नागरिक करीत आहेत. उदघाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या एसटी स्टॅण्ड इमारतीचे उदघाटन झाल्यास दुर्गम भागात बस सेवा वाढून नागरिकांना खाजगी वाहनात जीव धोक्‍यात घालून प्रवास करावा लागणार नाही.

Web Title: thane news talasari highway and st stands