हरित ठाण्यासाठी पालिकेची कसरत 

शर्मिला वाळुंज
बुधवार, 3 जानेवारी 2018

ठाणे - स्मार्ट सिटीसोबतच हरित ठाण्याच्या उभारणीसाठी ठाणे महापालिकेतर्फे नव्या वर्षात विविध स्पर्धा, प्रदर्शने होणार आहेत. वर्षाच्या सुरुवातीलाच महापालिकेतर्फे "वृक्षवल्ली 2018' हा उपक्रम होणार असून, त्याअंतर्गत उत्कृष्ट बाग सुशोभीकरण, निगा व देखभाल ही स्पर्धा, तसेच फूल, फळझाडे व भाजीपाल्याचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहेत. उत्कृष्ट बाग सुशोभीकरण या स्पर्धेसाठी ठाणेकरांकडून महापालिकेने डिसेंबरमध्ये अर्ज मागविले होते. या स्पर्धेसाठी 18 लाखांच्या घरात लोकसंख्या असलेल्या ठाणे शहरातून केवळ 300 अर्ज आले आहेत.

ठाणे - स्मार्ट सिटीसोबतच हरित ठाण्याच्या उभारणीसाठी ठाणे महापालिकेतर्फे नव्या वर्षात विविध स्पर्धा, प्रदर्शने होणार आहेत. वर्षाच्या सुरुवातीलाच महापालिकेतर्फे "वृक्षवल्ली 2018' हा उपक्रम होणार असून, त्याअंतर्गत उत्कृष्ट बाग सुशोभीकरण, निगा व देखभाल ही स्पर्धा, तसेच फूल, फळझाडे व भाजीपाल्याचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहेत. उत्कृष्ट बाग सुशोभीकरण या स्पर्धेसाठी ठाणेकरांकडून महापालिकेने डिसेंबरमध्ये अर्ज मागविले होते. या स्पर्धेसाठी 18 लाखांच्या घरात लोकसंख्या असलेल्या ठाणे शहरातून केवळ 300 अर्ज आले आहेत. ठाणेकरांचा थंड प्रतिसाद पाहता, आता वृक्षवल्ली प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळवण्यासाठी उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण समितीला कसरत करावी लागणार आहे. 

ठाणे महापालिका क्षेत्रात वृक्षलागवड मोठ्या प्रमाणात व्हावी. वृक्षसंवर्धन व्हावे, या हेतूने ठाणे महापालिका उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरण यांच्यातर्फे शहरात वृक्षवल्ली 2018 स्पर्धा होणार आहे. डिसेंबरमध्ये याविषयी महापालिकेच्या उद्यान विभाग, वृक्ष प्राधिकरण समिती व समाज विकास यांच्यातर्फे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. पालिका क्षेत्रातील महापालिकांच्या शाळा, खासगी शाळा, घराच्या सभोवताली, टेरेस, गृहसंकुल, कार्यालय (शासकीय, खासगी), महाविद्यालय, प्रार्थनास्थळ, रुग्णालय, कंपनी, दुकाने, उपाहारगृह, मॉल, शोरूम आदी कोणत्याही परिसरात उत्कृष्ट बागेची सजावट करीत, त्यांची योग्य निगा व देखभाल करणाऱ्यांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी 20 डिसेंबरपर्यंत नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार या स्पर्धेसाठी ठाण्यातील केवळ 300 नागरिकांनी अर्ज केले आहेत. परीक्षकांकडून या बगीचांचे परीक्षण सुरू असल्याची माहिती उद्यान विभागाने दिली. स्पर्धेसाठी कमी अर्ज आल्याने उद्यान अधिकाऱ्यांचाही हिरमोड झाला आहे. स्पर्धेला मिळालेला कमी प्रतिसाद पाहता, आता झाडे, फळे, फुले व भाजीपाला प्रदर्शनास नागरिकांचा कितपत प्रतिसाद लाभेल याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. 5 जानेवारीपर्यंत स्पर्धकांनी प्रवेश अर्ज पालिकेकडे जमा करावयाचे आहेत. 

वृक्षवल्ली 2018 अंतर्गत उत्कृष्ट बाग स्पर्धेसाठी 300 अर्ज दाखल झाले आहेत. या बागांचे सध्या परीक्षकांतर्फे परीक्षण सुरू आहे. झाडे, फुले, फळे व भाजीपाला यांचे प्रदर्शन 12 ते 14 जानेवारी या कालावधीत भरविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. उत्कृष्ट बाग सजावट व निगा या स्पर्धेतील विजेत्यांना प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी 14 जानेवारीला बक्षीस समारंभात उत्कृष्ट पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल. 
- डॉ. राहुल दुरगुडे, उद्यान तपासनीस 

मालमत्ता करात सूट मिळणार का? 
स्पर्धेत ज्या सोसायट्या वृक्षलागवड व संवर्धन यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करील त्यांना मालमत्ता करात सूट देता येईल का, अशी प्रश्‍नात्मक सूचना वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत समिती सदस्यांनी मांडली होती. त्यानुसार या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सोसायट्यांना किती प्रमाणात मालमत्ता करामध्ये सूट देता येऊ शकते, याचा सखोल अभ्यास करून त्या अनुषंगाने निश्‍चितच पुढील प्रकारे कार्यवाही केली जाईल, असे महापालिका आयुक्तांनी बैठकीत जाहीर केले होते. त्यानुसार आता सोसायट्यांना मालमत्ता करात सूट मिळणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

असा होईल कार्यक्रम 
12 ते 14 जानेवारी या कालावधीत मे. रेमंड कंपनी मैदान, पोखरण रोड नं. 1, ठाणे (प) येथे वृक्षवल्ली 2018 अंतर्गत 10 वे झाडे, फुले, फळे व भाजीपाल्याचे भव्य प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. 12 जानेवारीला दुपारी 3 वाजता या प्रदर्शनाचे उद्‌घाटन; तर 14 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता बक्षीस समारंभाने सांगता होणार आहे. 

Web Title: thane news thane municipal corporation