इमारतीचा राडारोडा पालिकेने उचलला 

इमारतीचा राडारोडा पालिकेने उचलला 

ठाणे - ठाण्याच्या खारकर आळी परिसरातील एनकेटी महाविद्यालयाजवळच्या 40 वर्षे जुन्या न्यू कॅप्टन इमारतीची 21 फेब्रुवारीला पडझड झाल्यानंतर अतिधोकादायक झाली होती. त्यानंतर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने इमारत रिकामी करून पाडली होती; मात्र बराच काळ उलटूनही येथील इमारतीच्या मलब्याचा राडारोडा उचलला नसल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते. रहिवाशांच्या या समस्येला "सकाळ'ने वाचा फोडून याबाबत नियमित पाठपुरावा केला होता. त्यामुळे तब्बल चार महिन्यांनंतर पावसाची उघडीप झाल्याचे पाहून अखेर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने जेसीबी लावून हा राडारोडा उचलण्याची कार्यवाही सुरू केल्याने नागरिक सुखावले आहेत. 

ठाणे पश्‍चिमेकडील मुख्य बाजारपेठेजवळ खारकर आळी, एनकेटी महाविद्यालयाजवळ तळ अधिक चार मजल्याची धोकादायक स्थितीतील न्यू कॅप्टन ही 40 वर्षे जुनी इमारत 21 फेब्रुवारीला ढासळण्यास सुरुवात झाली. दुपारी अचानक या इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या गॅलरीचा कठडा कोसळल्याने इमारतीखाली पार्क केलेल्या वाहनांचे नुकसान झाले होते. सुदैवाने यात जीवितहानी टळली होती; मात्र येथील रहिवासी महिलेसह तिची दीड वर्षीय मुलगी किरकोळ जखमी झाली होती. त्यानंतर पालिकेने इमारतीतील आठ कुटुंबांना तातडीने अन्यत्र हलवून त्यांची सोय तात्पुरत्या निवासात केली होती. तसेच, तातडीने रातोरात पालिकेने ही इमारत पाडली. 

इमारतीचा मलबा आणि पाडकामाचा राडारोडा जागीच पडलेला असल्याने हा परिसर अस्वच्छ बनला होता. कचरा आणि मलब्याचा भाग पावसाने कुजण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने डासांची उत्पत्ती होऊ लागली होती. त्यातच हा भाग मुख्य बाजारपेठेतील असल्याने येथे नेहमी वर्दळ असते. जवळच असलेल्या एनकेटी महाविद्यालयामुळे विद्यार्थ्यांच्याही आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. याबाबतची सविस्तर बातमी "सकाळ'ने दिल्यानंतर पालिकेने इमारतीशेजारील नागरिक न्यायालयात गेल्याचे कारण सांगून राडारोडा उचलण्यास असमर्थता दर्शवली होती; मात्र अतिक्रमण उपायुक्त अशोक बुरुपुल्ले यांनी जातीने लक्ष घालून परिसर मोकळा करणार असल्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार, सोमवारपासून (ता. 2) जेसीबी आणि इतर यंत्रणा लावून इमारतीचा मलबा हटवण्याचे काम सुरू झाले आहे. 

परिसर झाला होता अस्वच्छ 
इमारतीचा मलबा आणि पाडकामाचा राडारोडा जागीच पडलेला असल्याने हा परिसर अस्वच्छ बनला होता. कचरा आणि मलब्याचा भाग पावसाने कुजण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने डासांची उत्पत्ती होऊ लागली होती. त्यातच हा भाग मुख्य बाजारपेठेतील असल्याने येथे नेहमी वर्दळ असते. जवळच असलेल्या एनकेटी महाविद्यालयामुळे विद्यार्थ्यांच्याही आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com