अकार्यक्षमतेमुळे टीएमटी खासगीकरणाच्या दिशेने

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

ठाणे - परिवहन सेवेच्या बैठकीत पुन्हा एकदा टीएमटीची कार्यशाळा लक्ष्य ठरली. पुरेसा निधी दिल्यानंतरही जर बस दुरुस्त होऊन रस्त्यावर उतरत नसतील तर त्याला जबाबदार कोण, अशी विचारणा शुक्रवारी झालेल्या बैठकीत करण्यात आली. त्या वेळी नादुरुस्त बस दुरुस्त करून लवकरच त्या रस्त्यावर आणल्या जातील, अशी ग्वाही प्रशासनाने दिली.

ठाणे परिवहनच्या ताफ्यात कागदावर ३१७ बस आहेत; पण यापैकी वागळे आणि कळवा या महत्त्वाच्या आगारातून अवघ्या ८० बस रस्त्यावर धावत असल्याचे उघड झाले आहे. एवढेच नव्हे, तर रस्त्यावर उतरल्यानंतर यापैकी दिवसाला सुमारे ५० बस मध्येच बंद पडत असल्याच्या तक्रारी आहेत.

परिवहन सदस्य सचिन शिंदे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. वागळे आगारातून ३० ते ३५ आणि कळवा आगारातून १८ बस रस्त्यावर धावत असल्याचे सांगत नादुरुस्त बसचा लेखाजोखा ठेवला जात नाही, असा आरोप त्यांनी या वेळी केला.

परिवहनचे उत्पन्न वाढवायचे असेल तर चालक आणि वाहकांना विचारून रुट फायनल केले, तर नक्कीच परिवहनचे उत्पन्न आणखी वाढेल, असे मत सदस्य राजेंद्र महाडिक यांनी व्यक्त केले. वर्षभरापासून कार्यशाळेचा आणि बस नादुरुस्तीचा मुद्दा गाजत आहे; परंतु अद्यापही त्यावर कार्यवाही होत नसल्याचा आरोप महाडिक यांनी केला.

या आरोपांची दखल घेत परिवहनचे प्रभारी व्यवस्थापक संदीप माळवी यांनी कार्यशाळा सुधरवण्यासाठी प्रयत्न सुरू असून, बस दुरुस्तीसाठी तेथील कर्मचाऱ्यांना एक आठवड्याची मुदत दिल्याचे सांगितले. बस दुरुस्तीसाठी निधी देण्याचे आश्‍वासन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले असून, आगारातील ७० बस दुरुस्त होणार आहेत. यासाठी पाच ते सात कोटींचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली.

Web Title: Thane news TMT