दोन रुपयांसाठी प्रवाशाला मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

ठाणे - दोन रुपये सुटे देण्यावरून झालेल्या क्षुल्लक वादातून पाच रिक्षाचालकांनी एका प्रवाशाला बेदम मारहाण केली. मंगळवारी (ता. 20) सायंकाळी येथील गावदेवी रिक्षा थांब्याच्या परिसरात हा प्रकार घडला. या घटनेनंतर रिक्षा थांब्यावरील प्रवाशांनी यातील एका रिक्षाचालकास चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. उर्वरित रिक्षाचालकांनी तेथून पळ काढला. पोलिसांच्या गाडीलाही संतप्त जमावाने लक्ष्य केले होते. 

रिक्षाचालक महंमद सलीम शेख याला नौपाडा पोलिसांनी अटक केली. तुषार म्हात्रे (वय 27, रा. चेंबूर) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात खासगी कंपनीत काम करतो. मंगळवारी सायंकाळी कामावरून सुटल्यानंतर तो शेअर रिक्षाने स्थानकाकडे निघाला होता. गावदेवी परिसरात आल्यानंतर 20 रुपये प्रवास भाडे देण्याकरता तुषारने 50 रुपयांची नोट दिली. त्या वेळी रिक्षाचालकाने त्याच्याकडे दोन रुपये सुटे मागितले; मात्र सुटे पैसे नसल्याचे सांगितल्यावर दोघांत बाचाबाची झाली आणि रिक्षाचालकाने तुषारला मारहाण सुरू केली. त्या वेळी जवळच असलेल्या इतर चौघा रिक्षाचालकांनीही तुषारला मारहाण केली. हा प्रकार पाहून काही नागरिक तुषारच्या मदतीसाठी धावले. हे पाहून चौघा रिक्षाचालकांनी पळ काढला; मात्र एकास पकडून नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. 

घटनेची माहिती मिळताच नौपाडा पोलिसांची मदत वाहन घटनास्थळी पोहचली; मात्र संतप्त नागरिकांनी हे वाहनही लक्ष्य केले. रिक्षाचालकास नौपाडा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. इतर चौघांनाही तत्काळ अटक करा, अशी मागणी करत नागरिकांनी पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

पोलिसांसमोरच मारहाण 
भररस्त्यात मारहाण होत असताना परिसरातच उभे असणाऱ्या पोलिसांपैकी एकही मदतीसाठी धावला नाही, असा आरोप तुषारची बहीण दर्शना गणार यांनी केला. आरोपींवर कारवाई होईपर्यंत पोलिस ठाण्यातच ठाण मांडून बसण्याचा प्रयत्न त्यांनी केला. नंतर पोलिसांनी त्यांची समजूत काढली. 

Web Title: thane news Traffic Strike