रेल्वे कॅन्टीनमधील खाद्यपदार्थ महागले  

दीपक शेलार 
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

ठाणे - मुंबई-ठाण्यातील चाकरमान्यांसह रेल्वे प्रवाशांच्या पोटपूजेसाठी सोईच्या ठरणाऱ्या रेल्वे कॅन्टीनमधील आणि रेल्वे कॅटरिंगच्या खाद्यपदार्थांवर वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू केल्याने कॅन्टीनमधील सर्वच खाद्यपदार्थांचे दर किमान एक ते कमाल पंधरा रुपयांनी वाढले आहेत. रेल्वेस्थानकामधील कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांवर १२ टक्के तर, मेल-एक्‍स्प्रेसमधील स्वयंपाकगृहातील फिरत्या विक्रेत्यांकडील खाद्यपदार्थांवर १८ टक्के जीएसटी लागू करण्यात आला आहे. या दरवाढीमुळे कॅन्टीनमधील बटाटा वडा प्लेट १२ रुपयांवरून १३ तर, समोसा १६ रुपयांवरून १८ रुपये झाला आहे.

देशभरात १ जुलै २०१७ पासून जीएसटी लागू करण्यात आला. त्यानुसार मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक (वाणिज्य) व्ही. ए. बिमल रॉय यांनी २३ ऑगस्टला विशेष परिपत्रक जारी करून मुंबई विभागांतर्गत येणाऱ्या रेल्वेच्या सर्व उपाहारगृहातील खाद्यपदार्थांवर १२ टक्के आणि मेल गाड्यांमधील फिरत्या विक्रेत्याकडील खाद्यपदार्थांवर १८ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) लावणे बंधनकारक केले आहे. कॅन्टीन ठेकेदारांना वेळोवेळी जीएसटी कराचा भरणा संबंधित प्रणालीत भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वेच्या निर्देशानुसार, कॅन्टीनमधील इडली १२ रुपयांवरून १३, मेदूवडा १६ वरून १८, गरिबांचे कांदे पोहे १५ वरून १७ रुपये झाले आहेत. अशा तब्बल २७ न्याहरीच्या पदार्थांचे दर वाढले आहेत. अल्पोपाहारामधील (लाईट स्नेक्‍स) राजमा-चावल, व्हेज फ्राईडराईस आदी १३ खाद्यपदार्थांवर सरासरी २ ते ४ रुपये वाढ झाली आहे. जेवणातील पदार्थांमधील साधा डाळ-भात २० रुपयांवरून २२ रुपये झाला असून, या गटातील नऊ प्रकारच्या पदार्थांवर सरासरी ३ ते ४ रुपये दरवाढ झाली आहे. याशिवाय मांसाहारी आणि इतर मिष्ठन्नांवरही अशीच घसघशीत दरवाढ करण्यात आल्याने खवय्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

दरम्यान, रेल्वेस्थानकाबाहेर अवघ्या दहा रुपयांत वडापाव मिळत असताना रेल्वे कॅन्टीनमधील इवल्याइवल्या दोन बटाटा वड्यांसाठी १३ रुपये मोजावे लागणार असल्याने रेल्वे प्रवाशांनी नाराजी दर्शवली आहे.

लाडू, भेळेतही एक रुपयाची वाढ
बेसन आणि रवा लाडू, म्हैसूरपाक वडी, भेळ आदी पदार्थ प्रत्येकी एक रुपयांनी महागले असले तरी कॅन्टीनमध्ये पूर्वी ३ रुपयाला मिळणारा पाव १२ टक्के जीएसटी लागू झाल्यानंतरही ३ रुपयालाच मिळणार आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांतील फिरत्या विक्रेत्यांकडील पावासाठी मात्र प्रवाशांना ४ रुपये मोजावे लागणार आहेत.

Web Title: thane news train canteen food GST