आठवडा बाजार पुन्हा सुरू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

ठाणे - ठाण्याच्या गावदेवी मैदानावर होणारा आठवडा बाजार शनिवारी पुन्हा सुरू झाला आहे. या आठवड्यामध्ये सात शेतकरी गटांनी हजेरी लावली असून सात ते आठ टन भाजीपाल्याची विक्री केली. ग्राहकांना ताज्या भाज्या आणि फळे उपलब्ध करून देण्यासाठी थेट शेतकऱ्यांकडून होणाऱ्या या विक्रीला शनिवारी (ता. १०) ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात खरेदी केली.

ठाणे - ठाण्याच्या गावदेवी मैदानावर होणारा आठवडा बाजार शनिवारी पुन्हा सुरू झाला आहे. या आठवड्यामध्ये सात शेतकरी गटांनी हजेरी लावली असून सात ते आठ टन भाजीपाल्याची विक्री केली. ग्राहकांना ताज्या भाज्या आणि फळे उपलब्ध करून देण्यासाठी थेट शेतकऱ्यांकडून होणाऱ्या या विक्रीला शनिवारी (ता. १०) ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात खरेदी केली.

ग्राहकांना स्वस्त आणि ताजा भाजीपाला मिळत असल्याने शेतकऱ्यांना आजही चांगल्या दराची अपेक्षा आहे. शेतकरी संपामध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी आता पुन्हा आठवडा बाजाराला हजेरी लावली असून पुढील प्रत्येक शनिवारी या ठिकाणी येणार असल्याची माहिती ‘सकाळ’शी बोलताना दिली. 

शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी ठाण्यातील नऊ ठिकाणी आठवडा बाजार गेल्या वर्षी जून महिन्यात सुरू झाला होता. तेव्हापासून प्रत्येक शनिवार-रविवार ठाणे, पालघर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, अहमदनगर या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे गट व कंपन्या या आठवडा बाजारात सहभागी होत होत्या.

ठाण्यातील गावदेवी मैदानात पहिला संत सावतामाळी आठवडा बाजार भरला व तेथून हिरानंदानी कॉम्प्लेक्‍स, घोडबंदर रोड, ब्रह्मांड, साकेत, पारसिकनगर, कोपरी, एव्हरेस्ट सोसायटी, काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाशेजारी, वेदांत कॉम्प्लेक्‍स या ठिकाणी आठवडा बाजार भरत होते. शेतकरी संपामुळे या भागातून येणाऱ्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ठराव करून शेतमाल शहराकडे पाठवायचा नाही असे ठरवण्यात आले होते. त्यामुळे या संपाचा फटका शेतकरी आठवडा बाजाराला बसल्याचे सहभागी शेतकऱ्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना लागणारी मदत आमच्याकडून कायम केली जात आहे. त्याचा फायदा ग्राहकांना आणि ठाणेकरांना होत आहे. गेल्या आठवड्यात शेतकरी संपाचा फटका या बाजाराला बसला असला, तरी आता पुन्हा त्याच उत्साहाने शेतकरी शहरात दाखल होत आहेत. त्यांना चांगला भाव या शहरांमध्ये मिळाल्यास त्यांचाही उत्साह वाढू शकेल.
- संजय केळकर, आमदार

शहरातील स्पर्धा लक्षात घेऊन शेतकऱ्यांकडून आठवडे बाजारात भाजी विक्री केली जात आहे. ३०० कि.मी.वरून येणाऱ्या शेतकऱ्यांना वाहतूक खर्च, राहण्याचा खर्च आणि जेवणाचा खर्च करावा लागतो. आणखी एक ते दोन ठिकाणी बाजार वसल्यास शेतकऱ्याचा हा खर्च निघून त्यांना फायदा होऊ शकतो.
- मधुकर कांगणे, शेतकरी

Web Title: thane news vegetables