ठाण्यातील पाण्याची गुणवत्ता तपासणी

श्रीकांत सावंत
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

ठाणे - कळव्यातील विहिरीतील दूषित पाण्यामुळे सात कासवांच्या मृत्यू झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर कासवांच्या बचावासाठी प्रयत्न करणाऱ्या वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशन संस्थेने आता शहरातील जलस्त्रोतांच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ठाणे महापालिका प्रशासनाशी प्राथमिक पातळीवर चर्चा झाली आहे. के. जे. सोमय्या महाविद्यालयातर्फे या प्रकल्पावर काम करण्याच्या दृष्टीने सहमती देण्यात आली आहे.

ठाणे - कळव्यातील विहिरीतील दूषित पाण्यामुळे सात कासवांच्या मृत्यू झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर कासवांच्या बचावासाठी प्रयत्न करणाऱ्या वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशन संस्थेने आता शहरातील जलस्त्रोतांच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ठाणे महापालिका प्रशासनाशी प्राथमिक पातळीवर चर्चा झाली आहे. के. जे. सोमय्या महाविद्यालयातर्फे या प्रकल्पावर काम करण्याच्या दृष्टीने सहमती देण्यात आली आहे.

कळव्यातील हनुमान मंदिर परिसरातील विहिरीत काही कासवांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यावर वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी विहिरीत उतरून जिवंत कासवांना वाचवण्याचा प्रयत्न केला. या वेळी विहिरीतील पाणी अत्यंत प्रदूषित झाल्याचे त्यांच्या निदर्शनात आले होते. विहिरीतील पाण्याचे मूळ जलस्त्रोत नष्ट झालेले होते. यामुळे शहरातील विहिरीतील पाण्याच्या गुणवत्तेचा मुद्दा ऐरणीवर आला. या विहिरीच्या पाण्याचे नमुने तपासण्यासाठी संकलित करण्यात आले आहेत. 

या विहिरींतील पाण्याची गुणवत्ता कळणार असली, तरी शहरातील अन्य भागातील तलाव आणि विहिरींतील पाण्याची गुणवत्ता तपासणेही महत्त्वाचे आहे. यासाठीच वर्ल्डवाईल्ड संस्थेच्या स्वयंसेवकांनी ठाणे शहरातील जलस्त्रोतांमधील पाण्याची गुणवत्ता तपासण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ठाणे महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या संदर्भात चर्चा झाली असून, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुढील टप्प्यात आयुक्त संजीव जयस्वाल यांना भेटून त्यांच्यासमोर याची माहिती दिली जाणार आहे. मुंबईतील विद्याविहार येथील सोमय्या महाविद्यालयाचे पर्यावरणशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. संजय जोशी हे रासायनिक तपासणी करणार आहेत, अशी माहिती संस्थेचे आदित्य पाटील यांनी दिली. 

कळव्यातील घटनेमुळे या शहरातील जलस्त्रोतांची तपासणी करण्याच्या प्रयत्नांत सहभागी होण्याचा निर्णय महाविद्यालयाच्या पर्यावरणशास्त्र विभागाने घेतला आहे. या माध्यमातून पाण्याचे नमुने गोळा करून त्यांची गुणवत्ता शास्त्रोक्त पद्धतीने तपासली जाईल. महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेचा वापर त्यासाठी करता येईल. महाविद्यालयातील एमएस्सीच्या शेवटच्या वर्षात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रकल्पावर काम करता येणार असून, शिक्षणाबरोबर प्रत्यक्ष अनुभवही घेता येणार आहे. यासाठी सध्या प्राथमिक स्थरावर प्रयत्न सुरू आहे. लवकर नियोजनाद्वारे विद्यार्थी, वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशनचे स्वयंसेवक आणि महापालिकेच्या मदतीने हा उपक्रम पूर्ण करण्याचा मानस आहे. 
- प्रा. डॉ. संजय जोशी, पर्यावरणशास्त्र विभाग, के. जे. सोमय्या महाविद्यालय, मुंबई

Web Title: thane news water TMC