पुरातन विहीरच गायब 

दीपक शेलार
शनिवार, 29 जुलै 2017

ठाणे - ठाण्यात भूमाफियांकडून मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभारली जात आहेत. ती उभारण्यासाठी दिवा या उपनगरातील रेल्वेस्थानक परिसरात काही भूमाफियांनी चक्क पाण्याने भरलेली पुरातन विहीरच गायब केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिव्यातील ज्येष्ठ नागरिक चिंतामण भोईर यांनी याबाबत महापौर, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तानांही निवेदन पाठवून दाद मागितली आहे.

तलावांचे शहर अशी बिरुदावली मिरवणाऱ्या ठाणे शहरात तलावांसोबतच आता ग्रामपंचायतकालीन विहिरीही गायब केल्या जात आहेत. वाढत्या नागरीकरणामुळे नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी नळ असले, तरी पूर्वी शहरातील जुन्या विहिरींमुळे पाण्याची समस्या उद्‌भवत नव्हती. शहरातील अनेक गाव-पाड्यांना याच विहिरींतील पाण्याचा आसरा होता; मात्र शहरातील अनेक विहिरी काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. पश्‍चिमेकडील रेल्वेस्थानकाशेजारील परिसरात बारमाही पाणी असणाऱ्या दोन विहिरी आहेत. 

यातील रेल्वे तिकीट घराजवळची मोठी विहीर गायब झाल्याची तक्रार स्थानिक ज्येष्ठ नागरिक चिंतामण भोईर यांनी प्रशासनाकडे केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायत काळात १९५४ पासूनच्या या विहिरीतून पाणी भरण्यास मुंब्रा, दिवा येथील नागरिक येतात. काही स्थानिक भूमाफियांनी ही विहीर गायब करून या ठिकाणी बेकायदा गाळे उभारून भाड्याने दिले आहेत. याबाबत भोईर यांनी स्थानिक नगरसेवकांकडे लेखी तक्रारही केली आहे. 

दिवा-मुंब्रयात ८८ विहिरी
ठाणे महापालिकेच्या दप्तरी नोंद असलेल्या एकूण ५५५ विहिरी असून यातील २२९ सार्वजनिक आणि ११० खासगी अशा ३३९ विहिरी वापरात असून १५२ सार्वजनिक आणि ६४ खासगी विहिरी वापरात नाहीत. यातील दिवा-मुंब्रा भागात एकूण ८८ विहिरींपैकी ६६ विहिरी वापरात नसल्याची कागदोपत्री नोंद आहे.

विहिरीच्या ठिकाणी बेकायदा बांधकामे झाली असतील, तर याबाबतची माहिती घेतली जाईल. तक्रारीत तथ्य आढळल्यास प्रदूषण नियंत्रण नियमावली आणि महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमान्वये कायदेशीर कारवाई केली जाईल.
- अशोक बुरुपुल्ले, अतिक्रमण उपायुक्त, महापालिका, ठाणे.

Web Title: thane news well