ठाण्याच्या पोलिसाने केले 29 किलो वजन कमी 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 11 एप्रिल 2018

ठाणे - ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविकांत मालेकर यांनी अवघ्या दीड वर्षांत तब्बल 29 किलो वजन कमी केले आहे. त्याचा परिणाम पोलिस दलासाठी झाला असून पोलिस ठाण्यातील 80 कर्मचाऱ्यांनी आरोग्याची काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दीड वर्षांत त्यांनी मिठाई, चपाती, साखर हे खाणे टाळले. पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्यामुळेच हे शक्‍य झाल्याचे मालेकर सांगत आहेत. 

ठाणे - ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविकांत मालेकर यांनी अवघ्या दीड वर्षांत तब्बल 29 किलो वजन कमी केले आहे. त्याचा परिणाम पोलिस दलासाठी झाला असून पोलिस ठाण्यातील 80 कर्मचाऱ्यांनी आरोग्याची काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दीड वर्षांत त्यांनी मिठाई, चपाती, साखर हे खाणे टाळले. पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्यामुळेच हे शक्‍य झाल्याचे मालेकर सांगत आहेत. 

ठाण्यातील वागळे इस्टेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक या पदावर रविकांत मालेकर हे आहेत. दीड वर्षांपूर्वी मालेकर यांचे पोट इतके सुटलेले होते की त्यांना खुर्चीवर बसता येणेही शक्‍य होत नव्हते. तसेच चालतानाही त्यांना त्रास होत असे. रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करताना याचा त्रास नेहमी होत असे. एकेदिवशी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी त्यांना बोलावले. त्यांना पोट कमी करण्यास तसेच काही आरोग्याविषयी सल्ला त्यांनी दिला. आयुक्तांच्या सूचनेनंतर अवघ्या दीड वर्षांमध्ये 29 किलो वजन कमी केले. त्यांचे पूर्वी 130 किलो वजन होते. ते आता 99 किलोपर्यंत पोहचले आहे. त्यांच्या फिटनेसमुळे 80 कर्मचाऱ्यांनीही रोज तासभर व्यायाम करण्याचा निर्णय घेतला. पोलिस ठाण्याच्या बाजूलाच त्यांनी एक जीम उभारली आहे. यात सर्व प्रकारचे साहित्य ठेवल्याने दररोज ते या जीममध्ये जात आहेत. 

दिनक्रम असा आहे... 
पहाटे पाच वाजता ते उठतात. त्यानंतर तलावपाळीला सुमारे आठ ते नऊ चकरा मारतात. तलावपाळीची एक फेरी साधारण सव्वा किलोमीटर इतकी आहे. त्यानंतर परत ते व्यायाम करतात. दररोज उकळलेले पाणी पितात. तसेच गोड पदार्थही त्यांनी पूर्ण बंद केले आहे. त्यांनी आरोग्यासाठी जेवणात केलेला बदल पाहून त्यांच्या कुटुंबियांनीही गोड पदार्थ खाणे बंद केले आहे. सण-उत्सवातही आमच्या घरात कोणीही गोड पदार्थ खात नसल्याचे मालेकर यांनी सांगितले. तसेच रात्रीच्या जेवणात बिनतेलाची भाजी, फळे, मुगाची डाळ खातात. 

वजन वाढल्याने आणि पोट सुटल्याने गंभीर समस्या जाणवत होती. मात्र, आयुक्त परमवीर सिंग यांनी मार्गदर्शन केल्यानंतर मी आरोग्याची काळजी घेण्याचे ठरवले. आता माझ्या पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि कुटुंबीयही त्यांच्या आरोग्याविषयी काळजी घेत आहेत. नागरिकांनीही आरोग्याविषयी काळजी घ्यावी, जेणेकरून पुढील आयुष्य सुसह्य होईल. 
- रविकांत मालेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वागळे इस्टेट पोलिस ठाणे. 

Web Title: Thane police has done 29 kg weight loss