सलग दुसऱ्या दिवशी ठाण्यात वाहतूक कोंडी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

ठाणे : ठाणेकरांसह शहराच्या वेशीवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना शुक्रवारप्रमाणेच शनिवारीही वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. दोन्ही दिवशी सकाळपासूनच घोडबंदर, माजिवडा, कॅडबरी, तीन हात नाका परिसरात वाहतुकीचा वेग मंदावला होता. तसेच मुंबई आणि नाशिककडे जाणारी वाहतूकही धीम्या गतीने सुरू होती. त्यात अवजड वाहनांची संख्या वाढल्याने कोंडी वाढली होती. 

शुक्रवारी एमएसआरडीसीकडून खड्डे बुजवण्याचे काम सुरू होते, तर शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतूक विभागाला कोणतीही पूर्वसूचना न देता खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले. त्यामुळे वाहतूक कोंडीत वाढ झाल्याचे कळते. शुक्रवारी सकाळपासून घोडबंदर आणि कळवा पुलावर वाहतूक कोंडी झाली होती. ठेकेदारांनी सकाळच्या सत्रात खड्डे बुजवण्यास सुरुवात केली होती. शनिवारीही याच मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते. त्यामुळे वाहतुकीचे नियोजन करताना पोलिसांची दमछाक झाली होती. 

ठेकेदारांना नोटीस बजावणार 
तीनहात नाका व आजुबाजूच्या परिसरात ठेकेदारांनी सकाळी खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले होते. त्यामुळे तीनहात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी, माजिवडा, नाशिककडे जाणारे रस्ते, आनंद नगर चेकनाका या भागांत दुपारी 1 वाजेपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. याची माहिती मिळताच वाहतूक विभागाने ठेकेदारांना समज देत काम बंद केले. खड्डे बुजवण्याचे काम रात्री 12 ते पहाटे 6 वाजेपर्यंत करण्याचे ठरले असताना दिवसा खड्डे बुजवले जात असल्यामुळे कोंडी होते, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त अमित काळे यांनी दिली. याप्रकरणी ठेकेदारांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: Thane traffic congestion for the second consecutive day