ठाण्यात पाणीकपात निम्म्यावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

ठाणे - अंगाची लाहीलाही करणाऱ्या मे महिन्यातील उन्हाचे चटके सोसणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना सध्या सोसावी लागणारी १४ टक्के पाणीकपात अचानक निम्म्याने कमी करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पाणीकपात अवघी सात टक्के केल्याने नागरिकांची पाणीटंचाईच्या झळींतून मुक्तता होणार आहे. 

ठाणे - अंगाची लाहीलाही करणाऱ्या मे महिन्यातील उन्हाचे चटके सोसणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना सध्या सोसावी लागणारी १४ टक्के पाणीकपात अचानक निम्म्याने कमी करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पाणीकपात अवघी सात टक्के केल्याने नागरिकांची पाणीटंचाईच्या झळींतून मुक्तता होणार आहे. 

ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिकांमध्ये मागील वर्षी १४ टक्के पाणीकपात केल्याने भीषण पाणीटंचाई उद्‌भवली होती. यंदा मात्र पाटबंधारे विभागाने अचानक कपात निम्म्यावर आणत सात टक्के केली आहे. आतापर्यंत महिन्यात चार दिवस पाणीकपात लागू होती. सद्यस्थितीत महिन्यातून केवळ दोनच दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या मार्गदर्शक सूचना पाटबंधारे विभागाने जिल्ह्यात पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणांना दिल्याने उन्हाच्या काहिलीत पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार नाही. पावसाळा अद्याप दूर असला तरी १५ जुलैपर्यंत पाणी पुरवणे आवश्‍यक बनल्याने जादा पाणी उचलणाऱ्या प्राधिकरणावर निर्बंध घालण्यात आले होते. पाण्याचे ऑडिट करून काही महापालिकांना दंडासह पाणी बंद करण्याची सक्त ताकीद देण्यात आली होती. सुमारे १० टक्‍क्‍यांपर्यंत जादा पाणी उचलण्यास अनुमती देताना महापालिकांनी त्या बदल्यात आठवड्यात एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे धोरण निश्‍चित केले होते. डिसेंबरपासून सात टक्के लागू केलेली पाणीकपात जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात १४ टक्के करण्यात आली होती. आता धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन ही कपात निम्म्याने कमी केली आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी असलेल्या पाणीसाठ्याच्या तुलनेत दुप्पट साठा धरणात आहे.बारवी धरणासह उल्हास नदी, बदलापूर बंधारा आणि मोहने बंधारा यातून पाणीपुरवठा होणाऱ्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मिरा-भाईंदर या महापालिकांप्रमाणेच अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर नगरपालिकांची पाणीकपात सात टक्‍क्‍यांनी कमी केली आहे. परिणामी महिन्यातून केवळ दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे धोरण एमआयडीसी, महाराष्ट्र जल प्राधिकरण, शहाड-टेमघर (स्टेम) प्राधिकरण आणि महापालिकांच्या पाणीपुरवठा यंत्रणांकडून अवलंबले जाणार आहे. 

वेळापत्रक कोलमडण्याची शक्‍यता 
ठाणे जिल्ह्याला भातसा, बारवीसह काही धरणांमधून पाणीपुरवठा होतो. जलसंपदा विभागाने महापालिका, एमआयडीसीसह प्राधिकरणांना पाण्याचा कोटा निश्‍चित केला आहे. त्यानुसार जुलैपर्यंत पाणीसाठा पुरू शकतो; मात्र काही प्राधिकरणांकडून कोट्यापेक्षा जादा पाणी उचलले गेल्यास पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्‍यता आहे, असे स्टेम प्राधिकरण प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: Thane water cut to half