ठाणेकरांना मिळणार मुबलक पाणी!

जलवाहिन्या दुरुस्तीचे सुरू असलेले काम
जलवाहिन्या दुरुस्तीचे सुरू असलेले काम

ठाणे : जलवाहिनी फुटून होणारे जलप्रपात आणि गळतीद्वारे होणाऱ्या पाण्याच्या नासाडीला आता पूर्णविराम मिळण्याची आशा आहे. ठाणे व मुंबईकरांना शुद्ध आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने महापालिकेसह इतर प्राधिकरणांनी पावले उचलण्यास सुरुवात केली असून ब्रिटिशकालीन जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलण्याचे काम ठाण्यात प्रगतिपथावर आहे. पूर्वीच्या 1800 मि.मी. व्यासाच्या दोन जलवाहिन्या बदलून आता एकच 3000 मि.मी. व्यासाची तब्बल 44 किलोमीटर लांबीची एकच जलवाहिनी टाकण्याचे काम येत्या कालावधीत पूर्ण होणार असल्याचा दावा मुंबई महापालिकेच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

तानसा, वैतरणा धरणांमधून पाणी आणणाऱ्या जलवाहिन्या सुमारे 125 वर्षे जुन्या आहेत. सुमारे 450 किलोमीटरपर्यंतचा पट्टा या जलवाहिन्यांच्या जाळ्याने व्यापला आहे. या जलवाहिन्या आतून आणि बाहेरून बऱ्याच खराब झाल्या असून त्यांची झीजदेखील झाली आहे. अनेकदा विविध प्राधिकरणांची विकासकामे अथवा खासगी कंपन्यांच्या खोदकामामुळे अथवा अनेकदा पाण्याचा दाब वाढून जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार घडतात. जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांमुळे दूषित पाणीपुरवठा, गळतीमुळे वाया जाणारे पाणी, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा आदीमुळे विविध समस्या उद्‌भवतात किंबहुना नागरिकांच्या आजाराचे प्रश्नही निर्माण होतात. 

त्यामुळे जुन्या जलवाहिन्या बदलण्याचे काम मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे. गेली तीन वर्षे हे काम सुरू असून येत्या काही काळात संपूर्ण जलवाहिन्या बदलण्यात येणार आहेत. पूर्वी 1800 व्यासाच्या दोन जलवाहिन्या होत्या. त्या जागी आता 3000 मि.मी. व्यासाची एकच मोठी जलवाहिनी टाकण्यात येत आहे. त्यामुळे पाणीगळतीला आळा बसून दूषित पाणीपुरवठ्याचे प्रकारही कमी होणार असून पाण्याचीदेखील बचत होण्यास मदत मिळेल, असा आशावाद महापालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

जलवाहिनीला सुरक्षाकवच गरजेचे 
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्‍यात तानसा तलाव असून येथून पाणी वाहून नेणाऱ्या जलवाहिन्यांच्या सुरक्षेसाठी पालिकेडे कोणतीही यंत्रणा नाही. ग्रामीण क्षेत्रातून निघालेल्या या जलवाहिन्या ठाण्याच्या शहरी भागातून मार्गक्रमण करीत असल्याने अनेक ठिकाणी या जलवाहिन्यांना झोपड्याचा वेढा पडला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी जलवाहिन्या फोडून पाणीचोरीचे प्रकार घडतात. सद्यस्थितीत जलवाहिन्या बदलताना जलवाहिनी परिसरातील झोपडपट्टीमुळे काम करताना बंधने येतात. अनेकदा वादाचे प्रसंगदेखील उद्‌भवतात. तेव्हा, जलवाहिन्यांना सुरक्षाकवच असणे गरजेचे बनले आहे. 

तानसा पूर्व-पश्‍चिम ही 44 किलोमीटरची जलवाहिनी बदलण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. गेल्या काही वर्षात जलवाहिनी फुटण्याचे; तसेच व्हॉल्व लिकेज होऊन पाणीगळतीचे प्रकार वारंवार घडून पाण्याची नासाडी होऊ लागली होती. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या ब्रिटिशकालीन असून या जलवाहिन्यांची अवस्था दिवसेंदिवस जीर्ण बनली आहे. त्यामुळेच ठाण्यातील बाळकूम ते भांडुपपर्यंत जलवाहिन्या बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून पूर्वीच्या तुलनेत अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. 
- शेखर शिंदे, प्रकल्प अधिकारी, मुंबई महापालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com