School : जि.प. शाळेतील शिक्षकाच्या बदलीने सारा गाव भावूक; पालक विद्यार्थ्यांकडून भावनिक निरोप | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

School

School : जि.प. शाळेतील शिक्षकाच्या बदलीने सारा गाव भावूक; पालक-विद्यार्थ्यांकडून भावनिक निरोप

विक्रमगड - जिल्हा परिषद कासड्यातील शिक्षक अजित गोणते सरांना ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी यांनी सन्मानपूर्वक निरोप दिला. या वेळी सारा गाव भावुक झाल्याचे पहावयास मिळाले.

जिल्हा परिषद शिक्षक म्हटला की 10 ते 5 अशी कामाची वेळ पाळणारे शिक्षक दिसतात, पण अजित सर हे त्याहून अगदी वेगळे होते. गेली 14 वर्षे त्यांनी विद्यार्थी सर्वांगीण विकास व गुणवत्ता, क्रीडास्पर्धा व वकृत्व स्पर्धेतील तालुका, जिल्हा पातळीवरील विद्यार्थ्यांचे यश, शाळेच्या भौतिक सुविधा, सांस्कृतिक कार्यक्रम, सहल असे विविध उपक्रम राबवून प्रत्येक पालक व ग्रामस्थांच्या मनात घर केले होते.

तशातच शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रणालीद्वारे अजित सरांची जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा अशी दोन्ही ठिकाणी बदली झाली आणि कासपाड्यातील ग्रामस्थांना भावुक हाऊन सरांचा निरोप द्यावा लागला.

"आमचे आदर्श शिक्षक आमचा अभिमान" असे पोस्टर लावून गावातील माता-भगिनी आरती ओवळत, रस्त्याच्या दुतर्फा विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांनी पुष्पवृष्टी करत, पारंपरिक "तारपा" वाद्याच्या गजरात कासपाड्यातून सरांची मिरवणूक काढली. मिरवणुकीत सर्व पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ भावुक होऊन सरांसोबत सरांसाठी सर्वजण रडत होते.

अनेकांना आयुष्यभर नोकरी करून सेवापूर्तीच्या शेवटच्या दिवशीसुद्धा असे प्रेम मिळत नाही, ते अजित गोणते सरांनी 14 वर्षात त्याच्या वयाच्या ऐन पस्तीशीत मिळविले. लहानापासून पुण्यात शिकलेले ग्रामीण भागाचा त्यांचा काडीचाही संबंध नसलेले अजित सर जेव्हा या आदिवासी ग्रामीण भागात शिक्षक म्हणून नोकरीला लागले, इथले ग्रामीण विद्यार्थी, गाव, गावातील ग्रामस्थ जेव्हा त्यांनी पहिल्यांदा बघितले तेव्हाच त्यांनी ठरवले होते की माझी खरी गरज इथे आहे.

पुढे त्यांनी कासपाड्यातील विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ हेच माझे कुटुंब मानून गावासाठी खूप काही केले. अनेक उपक्रम राबवून त्यांनी गावातील लोकांची मने जिंकली. या अजित सरांच्या प्रेमापोटी, आपल्याच कुटुंबातील एक व्यक्ती आपल्यातून सोडून चालली आहे म्हणून, जशी एखादी मुलगी लग्न होऊन सासरला जाते आणि तिला आपण आवंढा गिळत, कधी रडत-रडत निरोप देतो तसा सन्मानपूर्वक निरोप कासपाड्यातील ग्रामस्थांनी अजित सरांना दिला.

या शाळा व्यवस्थापन समितीच्या कार्यक्रमाच्या नियोजनात समितीचे आजी-माजी अध्यक्ष- विलास गरेल, राजू खरपडे, सदस्य- साई फडवळे, मनीलाल फडवळे, दिनेश खरपडे, ज्येष्ठ नागरिक- यशवंत गरेल, धोंडू टोकरे, रामदास गहला, शिक्षक सहकारी-नरेश पाटील, कौशल्या मॅडम, शाळेसाठी वेळोवेळी मदत करणारे सुहृद फौंडेशनचे रितीन सर,लिप्सा मॅडम, कासपाड्यातील ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.