
Mumbai Crime : आजारी वडिलांवरील उपचारासाठी मुलाची चोरी...
डोंबिवली - वडील आजारी असल्याने खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. रुग्णालयाचा खर्च परवडत नसल्याने व वडिलांच्या उपचारासाठी हातात पैसे नसल्याने तरुणाने चोरीचा पर्याय निवडला.
डोंबिवलीतील एका घरातून त्याने 5 लाख 92 हजारांची चोरी केली. मात्र सीसीटिव्ही मध्ये तो कैद झाल्याने विष्णूनगर पोलिसांनी त्याला मुरबाड येथून अटक केली. वैभव मुरबाडे (वय 21) असे अटक तरुणाचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 5 लाख 92 हजार किंमतीचा माल जप्त केला आहे.
मुरबाड मझील माझगाव ठुणे येथे वैभव राहण्यास आहे. त्याचे वडील आजारी असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयाचा खर्च भागविण्यासाठी जवळ पैसे नसल्याने वैभवने चोरी करण्याचे ठरविले. डोंबिवली पश्चिमेतील एका घरातून त्याने 5 लाख 92 हजार किंमतीचे दागिने चोरले.
याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करत परिसरातील सीसीटिव्ही चेक केले. यामध्ये वैभव चोरी करुन जात असल्याचे निष्पन्न झाले. तसेच वैभवने डोंबिवलीतील एका व्यापाऱ्याला हे चोरीचे दागिने विकले होते. यासर्व तांत्रिक बाबी तपासत पोलिसांनी त्याची ओळख पटवित मुरबाड येथून त्याला अटक केली.
या चोरीमध्ये त्याचा अल्पवयीन साथीदाराचा देखील सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डी. ए. भवार, अमोल आंधळे यांच्या पथकाने अटकेची कारवाई केली.