मुलीच्या लग्नासाठी जमविलेल्या पैशांवर चोरांचा डल्ला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

लातूर - मुलीचे लग्न थाटामाटात करावे, असे स्वप्न पाहत पित्याने दररोज थोडी-थोडी रक्कम गोळा केली; पण या पैशांवर चोरांनी डल्ला मारला, हे लक्षात येताच पित्याच्या डोळ्यांत टचकन पाणीच उभे राहिले. 

लातूर - मुलीचे लग्न थाटामाटात करावे, असे स्वप्न पाहत पित्याने दररोज थोडी-थोडी रक्कम गोळा केली; पण या पैशांवर चोरांनी डल्ला मारला, हे लक्षात येताच पित्याच्या डोळ्यांत टचकन पाणीच उभे राहिले. 

जाकीर मैनोद्दिन सय्यद (वय 41) असे या पित्याचे नाव आहे. आझमनगर भागात ते राहतात. ड्रायव्हिंग करून ते आपल्या कुटुंबांचा सांभाळ करतात. जवळच्या नातेवाईकाच्या लग्नासाठी म्हणून सय्यद कुटुंबीय नुकतेच इंदापूर येथे गेले होते. जाण्याआधी घराला कुलूप लावूनच ते बाहेर पडले होते; पण लग्नाहून परत आल्यानंतर त्यांना दाराला लावलेले कुलूप दिसले नाही. घरात पाहिले तर सगळे साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. कपाटाचे, पेट्यांचे कुलूप तोडले गेलेले होते. विशेष म्हणजे, त्यात चोरांना काहीही मिळाले नाही. शेवटी स्टीलच्या डब्यात ठेवलेले 40 हजार रुपये त्यांना मिळाले. ते घेऊन चोरांनी घरातून पळ काढला. 

स्टीलच्या डब्यात ठेवलेले हे पैसे सय्यद यांनी मुलीच्या लग्नासाठी जमा केलेले होते. दैनंदिन खर्च वाचवून ते पाचशे रुपये डब्यात ठेवत असत. यात आणखी काही जमा करून त्यांना आपल्या मुलीचे लग्न लावायचे होते; पण हे स्वप्न चोरांमुळे भंगले. या प्रकरणाची तक्रार त्यांनी विवेकानंद पोलिस चौकीत शनिवारी (ता. 12) दाखल केली. बंद घर असताना मध्यरात्री घराचे कुलूप तोडून चोरी झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. 

Web Title: theft in latur

टॅग्स