विवाह सोहळ्यात लाखाची चोरी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

मुंबई - विवाह सोहळ्यात चोरी करणाऱ्या महिलेला शनिवारी (ता. 8) ओशिवरा पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. काली ऊर्फ सुगना अजबसिंग सिसोदिया असे तिचे नाव आहे. न्यायालयाने तिला बुधवारपर्यंत (ता. 12) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. 

मुंबई - विवाह सोहळ्यात चोरी करणाऱ्या महिलेला शनिवारी (ता. 8) ओशिवरा पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. काली ऊर्फ सुगना अजबसिंग सिसोदिया असे तिचे नाव आहे. न्यायालयाने तिला बुधवारपर्यंत (ता. 12) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. 

जोगेश्‍वरी पूर्वेकडील श्‍यामनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या मुलाचे नोव्हेंबरमध्ये लग्न होते. हा सोहळा अंधेरी पश्‍चिमेकडील एका तारांकित हॉलमध्ये झाला. धार्मिक विधी पार पडल्यानंतर सायंकाळी छायाचित्रे काढली जात असताना या महिलेने स्वागत कक्षात पर्स ठेवली होती. त्या पर्समध्ये अंगठ्या, नथ, सोनसाखळी, एटीएम कार्ड, मोबाईल असा एकूण एक लाख 13 हजारांचा ऐवज होता. छायाचित्रे काढून झाल्यानंतर त्या परत आल्या, तेव्हा पर्स त्या ठिकाणी नव्हती. त्यांनी शोध घेतला असता, पर्स सापडली नाही. त्यानंतर त्यांनी ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

पोलिसांनी या तक्रारीची दखल घेऊन चोरीचा गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान एक संशयित महिला ओशिवरा परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीवरून शनिवारी पोलिसांनी काली सिसोदिया हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत तिने चोरीची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मूळ मध्य प्रदेशातील रहिवासी असलेल्या कालीकडून चोरीचा मुद्देमाल अद्याप हस्तगत करण्यात आलेला नाही. तिने चोरीचा ऐवज कोणाला दिला आणि तिचे साथीदार कोण होते, याबाबत ओशिवरा पोलिस तपास करत आहेत. 

चोरट्यांची कार्यपद्धत 
मुंबईत दरवर्षी लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्यानंतर अन्य राज्यांतील चोरटे दाखल होतात. या चोऱ्यांच्या टोळ्या गुन्ह्यांसाठी लहान मुलांचाही वापर करतात. लग्नकार्यातील गडबड-धावपळीचा गैरफायदा घेऊन ते चोऱ्या करून पसार होतात. 

Web Title: Theft in marriage ceremony

टॅग्स