व्हॅनमधील दीड कोटी चोरून चोरटे पसार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

मुंबई - धारावीतील "एटीएम'मध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या व्हॅनमधून दीड कोटींची रक्कम असलेली छोटी पेटी चोरून चोरट्यांनी पोबारा केला. ही धक्कादायक घटना गुरुवारी घडली. या परिसरातील सीसी टीव्ही चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धारावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोटाबंदीनंतर शहरात एटीएम कॅशव्हॅनमधील रक्कम लुटल्याची ही पहिलीच घटना आहे. 

मुंबईत भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी कॅशव्हॅनमधून पैशांची चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. एटीएम सेवा पुरवणाऱ्या खासगी कंपनीच्या युनिटने गुरुवारी दुपारी गोरेगाव येथे रक्कम कॅशव्हॅनमध्ये ठेवली. गोरेगाव येथून ती व्हॅन धारावीच्या एसबीआय एटीएममध्ये पैसे भरण्याकरिता आली होती. आत शस्त्र नसलेल्या सुरक्षारक्षकासह चार कर्मचारी होते. 

धारावीत ओएनजीसी येथील प्रियदर्शनी इमारतीखाली एसबीआयचे एटीएम आहे. पैशांची एक पेटी घेऊन दोन कर्मचारी आणि सुरक्षारक्षक एटीएमच्या दिशेने गेले. व्हॅनमध्ये फक्त चालक बसला होता. चार ते पाच जण व्हॅनजवळ आले. त्यांनी चालकाच्या नकळत दीड कोटींची रक्कम असलेली पेटी पळवली. हा प्रकार एका व्यक्तीने पाहिला. त्याने लगेच सुरक्षारक्षकाला सांगितले. पाहणी केल्यावर गाडीतील एक पेटी कमी असल्याचे आढळले. पोलिस नियंत्रण कक्षाला कळवल्यावर काहीच वेळात वरिष्ठ पोलिस अधिकारी आले. चोरटे पैसे घेऊन जात असल्याचे एका सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या चित्रीकरणात दिसले. कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पोलिसही करत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft near dharavi atm