बेस्टची वीज बिलेही रखडली 

बेस्टची वीज बिलेही रखडली 

मुंबई - एकीकडे कागदी तिकिटांचा तुटवडा असल्याने बेस्ट उपक्रमाला नामुष्की सहन करावी लागत आहे. दुसरीकडे कागदाचा तुटवडा असल्याने बेस्टच्या ग्राहकांना वीज बिले देण्यातही मोठी अडचण येत आहे. कागद नसल्याने वीज बिले रखडण्याची वेळ उपक्रमावर आली आहे. नियोजन आणि नियंत्रणाचा अभाव असल्याने लाखो वीजग्राहकांची बिले रखडण्याची वेळ आली आहे. बेस्टच्या कित्येक वीजग्राहकांना सप्टेंबरमधील वीज बिले न आल्याने स्टेशनरीच्या अभावाची तक्रार समोर आली आहे. 

शहरातील सुमारे 10 लाखपैकी 20 टक्के म्हणजे दोन लाखांवर ग्राहकांना बिले आलेली नाहीत. बेस्ट समिती बैठकीत त्यावरून प्रशासनाला सर्वपक्षीयांनी लक्ष्य केले. अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा त्यास कारणीभूत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला. 

बेस्ट उपक्रमाचे शहरात सुमारे 20 लाख ग्राहक आहेत. बिले छापण्यासाठी निविदा मागवून प्रिंटरची नेमणूक केली जाते; पण यंदाच्या प्रक्रियेत स्टेशनरीचा अभाव असल्याने लाखो ग्राहकांना सप्टेंबरची बिले न मिळाल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. मुंबई पालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही आपणास 8 तारखेस अपेक्षित असणारे बिल 22 तारीख उलटली तरीही मिळालेले नसल्याचे निदर्शनास आणून दिले. या प्रकारास अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचाही आरोपही त्यांनी केला. 

वीज बिले ग्राहकांना वेळेत न मिळाल्याने बेस्टचेही आर्थिक नुकसान झाले आहे. सात ते 10 दिवसांपर्यंत बिलांना विलंब झाल्याने मुदतपूर्व बिले भरणाऱ्या ग्राहकांना त्यात कोणतीही सवलत देण्यात येणार नाही. वीज बिल वितरण करणाऱ्या कंत्राटदाराकडे स्टेशनरीचा अभाव असल्याने त्रुटी राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. 

महाव्यवस्थापकांकडून दंड वसूल करा 
बेस्टच्या विद्युत विभागाची वाटचाल परिवहन उपक्रमाच्या दिशेने सुरू असून ही धोक्‍याची घंटा असल्याचे मत सदस्यांनी व्यक्त केले. सर्व गोंधळास केवळ कंत्राटदार नव्हे, बेस्टचे महाव्यवस्थापक आणि वरिष्ठ अधिकारी जबाबदार असून त्यांच्या वेतनातून काही रक्कम दंड म्हणून कापून घ्यावी, असे शिवसेना बेस्ट समिती 
सदस्य अनिल कोकीळ यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com