...तर चैत्यभूमीवर मुख्यमंत्र्यांना प्रवेश नाही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आणि समाधीस्थळ असलेल्या दादर येथील रेल्वेस्थानकाला "डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस' असे नाव देण्याची घोषणा सरकारने 6 डिसेंबरपूर्वी करावी, अशी मागणी भीम आर्मीने केली आहे. नामांतर न झाल्यास महापरिनिर्वाणदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चैत्यभूमीवर पाय ठेवू देणार नाही, असा इशाराही या संघटनेने दिला आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वांत विद्वान व्यक्ती म्हणून उल्लेख करत कोलंबिया विद्यापीठाने त्यांचा पुतळा उभारला आहे. केंद्र सरकारनेही दादर चैत्यभूमीजवळील इंदू मिलची जागा डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी देऊ केली आहे. परंतु, या कामाची अद्याप एक वीटही रचली गेली नाही याची खंत वाटते, असे भीम आर्मीचे महाराष्ट्रप्रमुख अशोक कांबळे यांनी म्हटले आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबरला देश-विदेशातील आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने चैत्यभूमीवर येतात. त्यामुळे याच दिवशी दादर रेल्वेस्थानकाच्या नामांतराची घोषणा सरकारने करावी, अशी मागणी या संघटनेचे महासचिव सुनील थोरात यांनी केली. 

या संघटनेने 6 डिसेंबर 2017 आणि 14 एप्रिल 2018 रोजी दादर स्थानकाचे प्रतीकात्मक नामांतर करून या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधले होते. या मागणीसाठी त्यांनी मुख्यमंत्री, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे (सीएसएमटी) मुख्य व्यवस्थापक आणि रेल्वे मंत्रालयाला निवेदने दिली आहेत. त्यामुळे सरकारने या नामांतरासाठी आंबेडकरी अनुयायांच्या आंदोलनाची वाट पाहू नये, असा इशाराही भीम आर्मीने दिला आहे.

Web Title: there is no entry to chief minister if they dont accept our demand