जलसेवेसाठी अजून वर्षभर प्रतीक्षा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मे 2019

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून नेरूळ ते भाऊचा धक्का व मांडवा या मार्गावर चालवण्यात येणाऱ्या जलसेवेकरिता मुंबई, नवी मुंबई व रायगडकरांना आणखीन एका वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नवी मुंबई - महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून नेरूळ ते भाऊचा धक्का व मांडवा या मार्गावर चालवण्यात येणाऱ्या जलसेवेकरिता मुंबई, नवी मुंबई व रायगडकरांना आणखीन एका वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. कायदेशीर प्रक्रिया व परवानग्यांचा खटाटोप पूर्ण करण्यासाठी सिडकोचे तब्बल दहा महिने वाया गेले. कागदपत्रांची पूर्तता नसल्याने कामाला उशिराने सुरुवात झाल्यामुळे डिसेंबर 2019 ऐवजी मार्च 2020 पर्यंत जेटीचे काम पूर्ण होणार आहे. 

पनवेलहून मुंबईत जाण्यासाठी शीव-पनवेल आणि ठाणे-बेलापूर हे दोन मार्ग सोडले, तर अन्य पर्यायी वाहतूक नसल्यामुळे सध्या रस्ते वाहतुकीवर कमालीचा ताण वाढला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने मुंबई आणि नवी मुंबईदरम्यान असलेल्या सागरी किनारपट्टीचा वापर करून जलमार्ग विकसित करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डातर्फे नेरूळ-भाऊचा धक्का-मांडवा या मार्गावर प्रवासी जलवाहतूक सेवा सुरू करण्याची घोषणा केंद्रीय जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. त्याप्रमाणे मांडवा येथे स्वतः महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डातर्फे फेरीबाव येथे मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे व नेरूळ येथे सिडकोतर्फे जेटी उभारण्याचे काम सुरू आहे. 

नेरूळ येथे उभारण्यात येणाऱ्या जेटी प्रकल्पासाठी एकूण 110 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. सिडकोने नेरूळ येथील टीएस चाणक्‍यच्या पाठीमागील खाडीकिनारी जेटी उभारण्याचे काम सुरू केले आहे. सध्या खाडीकिनारी जेटीचे आधारस्तंभ उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. त्याकरिता खोदकाम केले जात आहे. जेटी उभारण्याचे 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. 

2017 मध्ये प्रत्यक्ष जेटी उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली. त्यानुसार 2019 डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती; परंतु पाम बीच रस्त्यावरून जेटीवर जाण्यासाठी एक किलोमीटर अंतराचा उन्नत मार्ग तयार करावा लागणार आहे. त्याकरिता एक हेक्‍टर परिसरातील कांदळवने व पाणथळ जागा नष्ट होणार असल्याने सिडकोला पर्यावरण विभाग व मुंबई उच्च न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागल्या. या कामात तब्बल दहा महिन्यांपेक्षा जास्त अवधी निघून गेल्याने परवानग्या मिळून प्रत्यक्ष काम पूर्ण व्हायला 2017 वर्ष उलटून गेले, अशी माहिती सिडकोचे कार्यकारी अभियंता ए. के. महाले यांनी दिली. 

अशी असेल जेट्टी 
- 800 मीटर लांबीचा व 30 मीटर रुंदीचा रस्ता 
- 25 मीटर बाय 30 मीटर इतक्‍या लांबी-रुंदीची जेटी 
- जेटीवर एक प्रशस्त प्रशासकीय इमारत 
- जेटीवर एकाच वेळी 300 प्रवासी क्षमता असलेली बोट 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There will be a year waiting for water service boat