पहिल्यांदाच 'या' वस्तीतील मुली खेळणार क्रिकेट

हर्षदा परब
रविवार, 23 एप्रिल 2017

वस्तीतल्या मुलींची क्रिकेट मॅच 
मुलींना खेळाकडे वळविण्यासाठी त्यांना त्यांच्या आवडीचे खेळ सुचविण्यास सांगण्यात आले. त्यावेळी वस्तीतल्या मुलींनी क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली

मुंबई : क्रिकेट हा खेळ मुलांची- पुरुषांची मक्तेदारी असल्याचा समज मोडीत काढण्यासाठी उद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे ऐतिहासिक मॅच रंगणार आहेत. लर्निंग कम्युनिटी गर्ल क्रिकेट लीग या नावाने होणाऱ्या या सामन्यात वस्ती पातळीवरील 8 मुलींच्या टीममध्ये लढत होणार आहे. 

कोरोच्या लर्निंग कम्युनिटी प्रकल्पांतर्गत तरुणींना स्त्री-पुरुष समानतेबाबत माहिती देण्यात येते. या प्रकल्पांतर्गत मुलींशी बोलताना कार्यकर्त्यांना मुलींना खेळण्याची आवड असूनही एका ठराविक वयानंतर त्यांना खेळायला बंदी घालण्यात येत असल्याची बाब पुढे आली. त्यावेळी मुलींना खेळाकडे वळविण्यासाठी त्यांना त्यांच्या आवडीचे खेळ सुचविण्यास सांगण्यात आले. त्यावेळी वस्तीतल्या मुलींनी क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली अशी माहिती कोरोच्या कार्यकर्ता मुमताज शेख यांनी दिली.

क्रिकेट हा खेळ फक्त मुलांसाठीच ही भावना मोडीत काढण्यासाठी मग मुलींच्या क्रिकेटच्या मॅच घेण्याची कल्पना पुढे आली. त्यातून रविवार 23 एप्रिल 2017 रोजी शिवाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर लर्निंग कम्युनिटी गर्ल क्रिकेट लीग या नावाने या मॅचेस रंगणार आहेत. 

यामध्ये वाशी नाका, चेंबूर, शिवाजी नगर, गोवंडी या वस्तीतील 12 ते 19 वर्षांच्या महिलांच्या 8 टिम मध्ये या मॅचेस होणार आहेत. या मॅचसाठी मुलींनी 4 महिने प्रॅक्टीस केली आहे. प्रत्येक विभागाला नेमून दिलेल्या कोचच्या मदतीने या मुलींनी तयारी केल्याची माहिती कोरोच्या लर्निग कम्युनिटी प्रकल्पाच्या कार्यकर्ता रोहिणी कदम यांनी माहिती दिली. 
 

Web Title: these girls to play gully cricket league first time