समायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

मुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच अतिरिक्त शिक्षकांना शाळांमध्ये समायोजित करून न घेणाऱ्या संस्थांना शिक्षण विभागाने धक्का दिला असून, या संस्थांमधील पदे रद्द करण्यात येतील, असे शालेय शिक्षण सचिवांनी स्पष्ट केले आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्‍न रखडला आहे. पटसंख्या कमी झाल्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन जवळच्या शाळांमध्ये करण्यात येते. प्रशासकीय शाळातील शिक्षकांचे समायोजन हे रिक्त पदे असलेल्या खासगी शाळांमध्ये करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार शिक्षकांचे समायोजन झाले; परंतु अनेक शिक्षक शाळांवर रुजू होत नसल्याचे समोर आले आहे. तसेच संस्थाही शिक्षकांना रुजू करून घेत नसल्याने समायोजनाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करणाऱ्या शिक्षक आणि संस्थांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. जे शिक्षक समायोजन झालेल्या शाळेत रुजू होणार नाहीत, त्यांचे वेतन थांबवण्यात येणार आहे. तसेच संस्थांमधील पदेही रद्द करण्यात येणार आहेत. याबाबत शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांनी शिक्षण उपसंचालकांना सूचना दिल्या आहेत. 

Web Title: They will not be able to pay the teacher's salary even after adjustment