G-20 Meeting : जी-२० ऊर्जा संक्रमण कार्यगटाची तिसरी बैठक सोमवारपासून मुंबईत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

W-20 Conference

भारताच्या अध्यक्षतेखाली जी-२० ऊर्जा संक्रमण कार्यगटाची तिसरी बैठक मुंबईत सोमवारपासून तीन दिवस चालेल.

G-20 Meeting : जी-२० ऊर्जा संक्रमण कार्यगटाची तिसरी बैठक सोमवारपासून मुंबईत

मुंबई - भारताच्या अध्यक्षतेखाली जी-२० ऊर्जा संक्रमण कार्यगटाची तिसरी बैठक मुंबईत सोमवारपासून तीन दिवस चालेल. या बैठकीला सदस्य देशांसह विशेष आमंत्रित अतिथी देश, आंतरराष्ट्रीय ऊर्जासंस्था, जागतिक बँक, भारतीय जागतिक ऊर्जापरिषद आदींचे शंभराहून जास्त प्रतिनिधी सहभागी होतील.

भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाचे सचिव आलोक कुमार या बैठकीचे अध्यक्षपद भूषवतील. अपारंपारिक ऊर्जा मंत्रालयाचे सचिव भूपिंदरसिंह भल्ला, खाण मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज, कोळसा मंत्रालयाचे सचिव अमृत लाल मीना हजर राहतील. केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विशेष संबोधनाने बैठकीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात होईल.

भारताच्या अध्यक्षतेखाली जी २० परिषदेअंतर्गत समावेश करण्यात आलेली सहा प्राधान्य क्षेत्रे अशी आहेत.

१. तंत्रज्ञानातील तफावत दूर करून ऊर्जा संक्रमण

२. ऊर्जा संक्रमणासाठी कमी खर्चिक वित्त पुरवठा

३. ऊर्जा सुरक्षा आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळी

४. ऊर्जा कार्यक्षमता, औद्योगिक पातळीवर कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि जबाबदार वापर निश्चित करणे

५. भविष्यासाठी इंधन (3F) आणि

६. सर्वांसाठी स्वच्छ ऊर्जा आणि न्याय्य, किफायतशीर आणि सर्वसमावेशक ऊर्जा संक्रमण मार्ग.

बेंगळुरू आणि गांधीनगर इथे झालेल्या ऊर्जा संक्रमण कार्यगटाच्या पहिल्या दोन परिषदांमधील फलनिष्पत्ती लक्षात घेऊन मुंबईत होणाऱ्या तिसऱ्या बैठकीतील चर्चेत सर्वसमावेशक वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी कृतीआराखडा निश्चित केला जाईल.

या बैठकीच्या पार्श्वभूमीवर इतर आठ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘कमी खर्चिक आंतरराष्ट्रीय वित्त पुरवठ्याला चालना देण्याच्या उद्देशाने बहुपक्षीय विकास बँकेसह कार्यशाळा’, ‘न्याय्य उर्जा संक्रमण पथदर्शी योजनेवर परिसंवाद’, 'जैवइंधनावर परिसंवाद', ‘किनारपट्टीवरील वारे याविषयावर परिसंवाद’, ‘सर्वोत्तम जागतिक पद्धती सामायिक करणे आणि ज्या क्षेत्रांमध्ये कार्बनचा वापर आवश्यक आहे अशा क्षेत्रांमध्ये कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठीच्या पद्धतींवर विचारमंथन’, जी २० ईटीडब्लूजी आणि बी २० भारत ऊर्जा दृष्टीकोन यांच्यातील ऊर्जा संक्रमण मार्गांचा समन्वय साधणे' आणि 'उर्जा कार्यक्षमतेला गती आणि उर्जा कार्यक्षम जीवनाला प्रोत्साहन, अशी चर्चासत्रे होतील.