मुंबईचा झाला उकिरडा; सांडपाणी आणि कचऱ्याच्या 35 हजार तक्रारी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरू असतानाच मुंबईचा मात्र उकिरडा झाला आहे. कचरा, सांडपाणी आणि मलनिःसारण वाहिनीबाबत तब्बल 35 हजारहून अधिक तक्रारी महापालिकेकडे वर्षभरात आल्या आहेत.

मुंबई : देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरू असतानाच मुंबईचा मात्र उकिरडा झाला आहे. कचरा, सांडपाणी आणि मलनिःसारण वाहिनीबाबत तब्बल 35 हजारहून अधिक तक्रारी महापालिकेकडे वर्षभरात आल्या आहेत. त्यातील प्रत्येक तक्रार सुटण्यासाठी किमान 35 ते 36 दिवसांचा कालवधी लागत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली. त्याअंतर्गत देशभरातील शहरांमध्ये स्वच्छतेची स्पर्धाही घेण्यात आली; मात्र मुंबईचा क्रमांक दरवर्षी घसरत आहे. त्यातच प्रजा फांऊडेशनने जाहीर केलेल्या अहवालात सांडपाणी आणि मलनिःसारण वाहिनीच्या तब्बल 20 हजार 641 तक्रारी वर्षभरात पालिकेकडे आल्या. घनकचऱ्याच्या तब्बल 14 हजार 494 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील सांडपाण्याच्या 17 हजार 788 तक्रारी सोडवण्यात आल्या. कचऱ्याच्या 12 हजार 941 तक्रारींचे निराकरण करण्यात आले. 

कुर्ला आणि मालाडमध्ये गेल्या वर्षात मलनिःसारण आणि कचऱ्याच्या सर्वाधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. कचऱ्याच्या 1014 तक्रारी कुर्ला परिसरातून आल्या होत्या. मालाडमधून 723 तक्रारी आल्या होत्या. सांडपाण्याच्या 949 तक्रारी मालाडमधून आल्या होत्या. कुर्ल्यातील एक हजार 106 तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. 

टॉवरचा परिणाम 
नाना चौक, ताडदेव, मलबार हिल आदी भागांत मॅनहोलमधून सांडपाणी येत असल्याच्या सर्वाधिक 286 तक्रारी आल्या आहेत. या परिसरात पूर्वी जुन्या दोनचार मजल्यांच्या चाळी होत्या. त्यांच्या ठिकाणी आता टॉवर उभे राहू लागले आहेत; मात्र परिसरातील पायाभूत सुविधा वाढत नसल्याने त्याचा हा परिणाम दिसत आहे. ब्रिटिश काळात बांधण्यात आलेल्या मलवाहिन्यांवर अतिरिक्त ताण पडून त्या ओव्हरफ्लो होऊ लागल्या आहेत. 

अशा आहेत प्रमुख तक्रारी 
मैला आणि सांडपाणी तक्रारी सर्वाधिक तक्रारींचा विभाग तक्रारींची संख्या 
- मलनिःसारण वाहिनी तुंबणे मालाड 102 
- मलनिःसारण वाहिनी ओव्हर फ्लो कुर्ला 163 
- दुर्गंधी कुर्ला 190 
- नादुरुस्त मॅनहोल मालाड 182 
- अस्वच्छ सेप्टिक टॅंक कुर्ला 183 
- नादुरुस्त मैलावाहिनी मालाड 183 
- मॅनहोल ओव्हर फ्लो ग्रॅंटरोड 286 

कचऱ्याच्या तक्रारी सर्वाधिक तक्रारींचा विभाग - तक्रारींची संख्या 
- सार्वजनिक स्वच्छतागृहांची सफाई कुर्ला 156 
- मृत जनावरे कुर्ला 127 
- रस्त्याची सफाई नाही कुर्ला 154 
- कचऱ्याचे डबे पुरवले नाहीत कुर्ला 123 
- कचरा उचलणारी गाडी आली नाही कुर्ला 139 
- कलेक्‍शन पॉइंटवरून कचरा उचलला नाही कुर्ला 169 

Web Title: Thirty five Thousand complaints lodged in BMC on Garbage and waste sewage issue