ठाणे जिल्ह्यातील २६ हजार हेक्‍टर भातशेतीला पावसाचा फटका

संग्रहित
संग्रहित

ठाणे : परतीच्या पावसाने ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी आणि अंबरनाथ तालुक्‍यातील हळवा या भातपिकासह निमगरव व साठवलेल्या भाताला परतीच्या पावसाचा तडाखा बसला आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यातील लावणी केलेल्या भातशेतीपैकी २६ हजार ६४४ हेक्‍टरवरी भातशेतीचे नुकसान झाले आहे. त्यापैकी १३ हजार ५१५ हेक्‍टरवरील शेतीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. दरम्यान, शहापूर तालुक्‍यातील सर्वाधिक ७ हजार ९०० हेक्‍टर भातशेतीचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. 

जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ तालुक्‍यात सुमारे ५५ हजार हेक्‍टर क्षेत्रावर भातचे पीक घेण्यात येते. त्यात जिल्ह्यात जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस झाला. यात शेताच्या बाजूला साचलेले पाणी शेतात गेल्याने हजारो हेक्‍टर शेतीचे नुकसान झाले होते. त्या वेळी पाच तालुक्‍यातील १ हजार ८९७ हेक्‍टर क्षेत्रावरील शेतीचे ३३ टक्‍क्‍यांपेक्षा कमी नुकसान झाले, तर २९६ हेक्‍टर क्षेत्रावरील शेतीचे ३३ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याने ५ हजार ६८८ शेतकऱ्यांना फटका बसला. 

यातून शेतकरी सावरत असताना ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या व अवकाळी पावसाचा पुन्हा जिल्ह्यातील भातशेतीला फटका बसला आहे. सध्या अवकाळी पावसामुळे झालेल्या भातशेतीच्या नुकसानाचे पंचनामे करण्यात येत आहेत. यामध्ये ३१ ऑक्‍टोबरपासून नुकसान झालेल्या भातशेतींचे पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील सहा तालुक्‍यात एकूण २६ हजार ६४४ हेक्‍टर क्षेत्रातील भातशेतीचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. जिल्हा कृषी विभागाकडून १३ हजार ५१५ हेक्‍टरवरील शेतीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई द्यावी : कृषी सभापती
अवकाळी व परतीच्या पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. दिवाळीत आलेल्या अवकाळी पावसामुळे तयार झालेले भातपीक वाया गेले आहे. जिल्ह्याचे नागरीकरण वाढत असले, तरी अद्यापही मुरबाड व शहापूर, भिवंडी, अंबरनाथ तालुक्‍यात हजारो शेतकरी शेतीवर आपला उदरनिर्वाह करतात. शेतकऱ्यांनी भात, वरई, उडीद आणि नाचणी पिकासह अन्य पिकांची लगवड केली आहे. मात्र, या लागवडीला अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यामुळे राज्य सरकारने भाताबरोबरच नागली, वरईचेही तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी कृषी सभापती किशोर जाधव यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com