ठाण्यातून हजारो शिवसैनिक अयोध्येला रवाना

ठाण्यातून हजारो शिवसैनिक अयोध्येला रवाना

ठाणे - ठाण्यातून गुरुवारी दुपारी राम नामाचा जयघोष करत, तसेच भगवे झेंडे घेऊन हजारोंच्या संख्येने शिवसैनिक अयोध्येच्या दिशेने रवाना झाले. त्यांच्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली. शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, शहरप्रमुख हेमंत पवार यांनी शहरातील सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधून हजारो शिवसैनिकांना अयोध्येच्या दिशेने रवाना केले.

तत्पूर्वी प्रत्येक शिवसैनिकांची माहिती गोळा करण्यासाठी त्यांच्याकडून अर्ज भरून घेण्यात आले. एकनाथ शिंदे यापूर्वीच अयोध्येत दाखल झाले आहेत. त्यांनी तेथील संपर्क यंत्रणा राबवून या सर्व शिवसैनिकांची दोन दिवस राहण्याची आणि जेवणाची सोय केली आहे. फैजाबाद येथे ठाण्याची विशेष ट्रेन पोचल्यानंतर तेथून शिवसैनिकांना इच्छितस्थळी जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध आहे. तसेच राहण्यासाठी हॉटेलसह विविध संस्थांची विश्रामगृहे आरक्षित केली आहेत. शनिवारी २४ नोव्हेंबरला दुपारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार आहेत. त्यावेळी ते तेथील साधुसंतांबरोबर संवाद साधणार आहेत. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता शरयू नदीच्या किनारी महाआरती केली जाणार आहे. उद्धव ठाकरे हे रविवारी २५ नोव्हेंबरला रामजन्मभूमीला भेट देणार आहेत. याठिकाणी उद्धव यांना सभेसाठी स्थानिक प्रशासनाने मंजुरी दिली नसल्याचे कळते. त्यामुळे राम जन्मभूमीला भेट दिल्यानंतर उपस्थितांबरोबर संवाद साधून ते मुंबईकडे रवाना होणार आहेत.

एकाचवेळी महाआरती
उद्धव ठाकरे हे शरयू नदीच्या किनारी महाआरती करणार आहेत. याचदरम्यान एकाच वेळी राज्यातील विविध राम मंदिर आणि शहरातील महत्त्वाच्या मंदिरांमध्ये महाआरती केली जाणार आहे. त्यादृष्टीने पक्षाच्या वतीने नियोजन केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com