छोटा शकीलच्या नावाने कंत्राटदाराला धमकी 

छोटा शकीलच्या नावाने कंत्राटदाराला धमकी 


अंधेरी : कुख्यात गुंड छोटा शकील याच्या नावाने जोगेश्‍वरीतील कंत्राटदाराला धमकावणाऱ्या दोघांना ओशिवरा पोलिसांच्या विशेष पथकाने बेड्या ठोकल्या. आमीर सद्ररू खान ऊर्फ अम्मूभाय आणि दिनेश चंद्रकांत घोडके या आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 

तक्रारदार वसीम अजित खान हे कंत्राटदार असून, जोगेश्‍वरीतील गुलशन नगर येथील रहिवासी आहेत. त्यांच्या कंपनीद्वारे घराची डागडुजी, रंगरंगोटी, लाद्या बसवणे आदी कामे सुरू आहेत. सहा कर्मचारी हे काम करत होते. तेव्हा आमीर खान आणि दिनेश घोडके यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते असल्याचे सांगून महापालिकेची परवानगी घेतली नसल्यास काम बंद पाडण्याची धमकी दिली.

आमीर खान याने आपण छोटा शकील टोळीसाठी काम करत असल्याचे सांगितले. 
या दुकलीने वसीम खान यांना ऑक्‍टोबरमध्ये पुन्हा दूरध्वनीवरून धमकी देऊन खंडणी मागितली; पैसे न दिल्यास हातपाय तोडू, अशी धमकीही दिली. छोटा शकीलला दोन कोटी रुपये द्यावे लागतील, असे सांगून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्या वेळी वसीम खान यांनी 22 हजार रुपये देऊन सुटका करून घेतली.

त्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी पुन्हा 80 हजार रुपये दिले. 
नोव्हेंबरमध्ये खान यांच्या दुकानाचे नूतनीकरण सुरू असताना आमीर आणि दिनेश आले; छोटा शकीलला खंडणी देत नसल्याने ठार मारण्याची धमकी दिली. त्यांचे बांधकाम अनधिकृत असून, महापालिकेकडे तक्रार करून ते तोडू, असे धमकावले. 

मोठ्या प्रमाणात खंडणीवसुली 
वसीम खान यांनी ओशिवरा पोलिस ठाण्यात आमीर खान व दिनेश घोडके यांच्याविरोधात खंडणीची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्यांना खंडणी घेताना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून एक आलिशान कार आणि खंडणीची रक्कम हस्तगत केली. आरोपींनी मागील तीन-चार वर्षांत छोटा शकीलच्या नावाने मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर गायके, निरीक्षक रघुनाथ कदम, श्रीकांत तावडे यांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com