नवी मुंबईत वाहन चोरी करणारे ३ जण अटकेत

नवी मुंबईत वाहन चोरी करणारे ३ जण अटकेत
नवी मुंबईत वाहन चोरी करणारे ३ जण अटकेत

नवी मुंबई : वाशी आणि सीबीडी परिसरात वाहनचोरी करणाऱ्या टोळीतील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही टोळ्यांकडून पोलिसांनी वाहनचोरी करण्यासाठी लागणारे साहित्य व हत्यारे जप्त केली आहेत. या टोळ्यांनी नवी मुंबईच्या विविध भागांतून अनेक वाहने चोरली असण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार पोलिसांकडून या टोळीतील आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे.  

सीबीडी, सेक्‍टर- ६ मध्ये राहणारे ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक हरपिंदर सिंग यांनी आपली कार बुधवारी रात्री आपल्या सोसायटीबाहेर रस्त्यावर उभी केली होती. या वेळी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास वाहन चोरणाऱ्या टोळीतील तिघांनी त्यांच्या कारची काच फोडली; मात्र याचदरम्यान हरपिंदर सिंग यांचा मुलगा हरप्रित सिंग हा कार घेऊन जाण्यासाठी त्या ठिकाणी आला. या वेळी हरप्रित याला स्कॉर्पिओच्या आतमध्ये काही व्यक्ती बसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कारमध्ये चोरटे असल्याचा संशय आल्याने हरप्रित याने तत्काळ आपल्या मित्रांना त्या ठिकाणी मदतीसाठी बोलावले; मात्र दोघा चोरट्यांनी त्याठिकाणाहून पळ काढला; मात्र अब्दुल शेख (४५) हा चोरटा त्यांच्या हाती लागला. रुस्तुम खान (२७) हा तिसरा चोरटा लपून बसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे हरप्रित आणि त्याच्या साथीदारांनी त्यालादेखील पकडून दोघांना पोलिसांच्या स्वाधीन केले. दोघेही चोरटे गोवंडी भागात राहण्यास असल्याचे आढळून आले. 

दरम्यान, त्याच दिवशी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास दुसरी टोळी वाशी सेक्‍टर- १४ मध्ये वाहन चोरण्यासाठी आली होती. या वेळी सदर टोळी रस्त्याच्या बाजूला पार्क असलेली जयवंत यमगर यांची इन्होव्हा कार चोरून नेण्याच्या प्रयत्नात होती; मात्र वाशी पोलिस ठाण्याचे पथक गस्त घालत असाताना हे चोरटे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांची धरपकड केली. सदर टोळीतील पाच आरोपी कारमधून पळून गेले; मात्र इनायतुल्ला रहेमतुल्ला शहा (३१) हा पोलिसांच्या हाती लागला. त्यामुळे पोलिसांनी त्याला वाहनचोरी प्रकरणात अटक करून पळून गेलेल्या त्याच्या पाच सहकाऱ्यांचा शोध सुरू केला. या दोन्ही टोळीकडून नवी मुंबईतील वाहनचोरीचे अनेक गुन्हे उघड होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार या टोळ्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com