मुंबई : टिळक नगरमधील आगीत तीन वृद्धांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

अग्निशमन यंत्रणा नादुरुस्त
या इमारतीमध्ये विकसकाने बसवलेली अग्निप्रतिबंधक यंत्रणा काम करत नसल्याची तक्रार रहिवाशांनी अग्निशमन दलाकडे वर्षभरापूर्वी केली होती, असे समजते. परंतु त्याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
 

मुंबई : चेंबूरमधील टिळक नगर येथील सरगम सोसायटी या इमारतीत गुरुवारी (ता. 27) रात्री आगीचा भडका उडाला. या आगीत एकाच घरातील तीन वृद्धांचा मृत्यू झाला, तर एका ज्येष्ठ नागरिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टिळक नगर येथील 16 मजली सरगम सोसायटीच्या (इमारत क्रमांक 35) बी विंगमधील 11 व्या मजल्यावर रात्री 8 वाजण्याच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलातील जवानांनी दोन बंबगाड्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घरांमधील ज्वलनशील वस्तूंमुळे आग झपाट्याने पसरू लागल्यावर तीन अतिरिक्त बंबगाड्या घटनास्थळी आल्या. 

या आगीत एकाच घरातील सुनीता जोशी (72), भालचंद्र जोशी (72) आणि सुमन जोशी (83) या तीन वृद्धांचा मृत्यू झाला. धुरामुळे गुदमरलेले श्रीनिवास जोशी (86) यांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अग्निशमन जवान चार जेट पंपांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. आगीतून दोन जखमींना बाहेर काढण्यात आले असून, आणखी पाच ते सहा व्यक्ती अडकून पडल्याची शक्‍यता आहे. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्‍यात आली नव्हती. 

अग्निशमन यंत्रणा नादुरुस्त
या इमारतीमध्ये विकसकाने बसवलेली अग्निप्रतिबंधक यंत्रणा काम करत नसल्याची तक्रार रहिवाशांनी अग्निशमन दलाकडे वर्षभरापूर्वी केली होती, असे समजते. परंतु त्याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
 

Web Title: three citizens dead in Fire at Mumbai

टॅग्स