
Mumbai : मुंबई शहरात गेल्या 24 तासांत पोलिसांवर हल्ल्याच्या तीन घटना,चौघांना अटक
मुंबई : पोलिसांना मारहाण झाल्याचा तीन घटना गुरूवारी शहरात घडल्या. याप्रकरणी देवनार, कुरार व साकिनाका पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीन गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
देवनारमध्ये महिला पोलिसांवर हल्ला
देवनार येथील घटनेत महिला पोलिसाला मारहाण करण्यात आली आहे. गोवंडी येथील मानखुर्द – घाटकोपर जोडरस्ता येथील ‘लजीत’ हॉटेलजवळ एक दाम्पत्य रस्त्यावर भांडण करीत असल्याची माहिती शुक्रवारी पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार तक्रारदार महिला पोलीस इतर पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाल्या. त्यावेळी महिला आरोपी साफिया खान हिने महिला पोलिसाचे केस धरून तिला मागे खेचले व दुचाकीवर ढकलले. तसेच आरोपी महिलेच्या पतीने पोलीस शिपाई गोरे यांच्या कानाखाली मारली व त्यात त्यांच्या उजव्या डोळ्याखाली इजा झाली.
देवनार पोलिसांच्या हद्दीत घडलेल्या हल्ल्याच्या घटनेत महिला पोलीस शिपाई मनिषा देशमुख यांच्या तक्रारीवरून सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे, धमकावणे अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरानंतर साफिया खानला अटक करण्यात आली.याप्रकरणी तिचा पती फिरोज खान याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयित आरोपीकडून हल्ला
साकिनाका येथे घडलेल्या दुसऱ्या घटनेत रॉबीन यल्लपा ऊर्फ सलीम येला याला पोलिसांनी अटक केली. आरोपीविरोधात यापूर्वी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. आरोपी साकीनाका परिसरातील संघर्ष नगर येथील एका इमारतीच्या मागे संशयीतरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुरूवारी त्याला चौकशीसाठी ताब्यात गेले असता त्याने पोलिसावर हल्ला केला. पोलिसांना मारहाण करणाऱ्या रॉबीनला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुरारमध्ये वाहनचालकाचा वाद
कुरार परिसरात पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी अनिल हिवाळे व शेखर बनसोडे या दोघा आरोपीना गुरूवारी रात्री अटक करण्यात आली. दोघेही वाहनचालक आहेत. दोन्ही आरोपी कुरार गाव येथे दारू पिऊन रस्त्यावर आरडाओरडा करीत होते. तेथे गेलेले पोलीस शिपाई संतोष सुरनर यांनी आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी हिवाळेने सुरनर यांचा गणवेश फाडला, तर बनसोडेने सुरनर यांना मारहाण केली. या दोघांनाही घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले. बनसोडेविरोधात विलेपार्ले पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. त्यात विनयभंग व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोन गुन्ह्यांचा समावेश आहे. दोन्ही आरोपींविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.