तिघा डॉक्‍टरांविरुद्ध १२०३ पानी आरोपपत्र

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

नायर रुग्णालयातील निवासी डॉक्‍टर पायल तडवी यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या गुन्हे शाखेने १२०३ पानांचे आरोपपत्र मंगळवारी (ता. २३) विशेष न्यायालयात दाखल केले. यात डॉ. पायल यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीचाही (सुसाइड नोट) समावेश आहे. त्यांच्या मोबाईलमधून नष्ट करण्यात आलेली ही सुसाइड नोट न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या मदतीने पुन्हा मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे.

मुंबई - नायर रुग्णालयातील निवासी डॉक्‍टर पायल तडवी यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या गुन्हे शाखेने १२०३ पानांचे आरोपपत्र मंगळवारी (ता. २३) विशेष न्यायालयात दाखल केले. यात डॉ. पायल यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीचाही (सुसाइड नोट) समावेश आहे. त्यांच्या मोबाईलमधून नष्ट करण्यात आलेली ही सुसाइड नोट न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या मदतीने पुन्हा मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे. 

नायर रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉ. पायल तडवी यांनी २२ मे रोजी वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते. याप्रकरणी डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्याचे गांभीर्य ध्यानात घेऊन मुख्यमंत्र्यांनी तपासकार्य मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचा आदेश दिला.

या दोषारोपपत्रात पोलिसांनी १८० हून अधिक जणांचे जबाब नोंदविल्याचे कळते. त्यात डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. पायल यांच्यातील मोबाईल संभाषण, पायल यांचे सहाध्यायी, नातेवाईक आणि वरिष्ठ डॉक्‍टरांच्या जबाबांचा समावेश आहे. डॉ. पायल यांना आत्महत्या करणे भाग पाडणे आणि पुरावे नष्ट केल्याच्या प्रकरणी तिन्ही महिला डॉक्‍टरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कुटुंब, पतीकडे क्षमायाचना
गुन्हे शाखेला डॉ. पायल यांच्या मोबाईलमध्ये आत्महत्येपूर्वी लिहिलेली तीन पानांची चिठ्ठी आढळली. या सुसाइड नोटमध्ये त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याबद्दल कुटुंब आणि पतीची माफी मागितली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three Doctor 1203 Pages Charge sheet Crime Dr Payal Tadvi Suicide Case