मेट्रो तीनचा मार्ग पुन्हा अडकला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

मुंबई - मेट्रो रेल्वेच्या तिसऱ्या टप्प्यातील गिरगाव आणि काळबादेवी स्थानकांसाठी झाडे कापण्याच्या प्रस्तावाला बुधवारी (ता. 16) शिवसेनेसह सर्व विरोधी पक्षांनी विरोध करत तो नामंजूर केला. प्रस्ताव आयत्या वेळी वृक्ष प्राधिकरणापुढे सादर करण्यात आल्याची सबब पुढे करत फेटाळून लावण्यात आला असून आठवडाभरात पुन्हा त्यासाठी बैठक घेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. झाडे कापण्याचा प्रस्ताव रखडला असला, तरी मेट्रो रेल्वेच्या सातव्या टप्प्यासाठी वडाळ्यातील झाडे कापण्यास वृक्ष प्राधिकरणाने मंजुरी दिली. 

मेट्रो रेल्वेच्या कुलाबा-वांद्रे सिप्झच्या तिसऱ्या टप्प्याला शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. मेट्रो रेल्वेसाठी महापालिकेचे भूखंड देण्याचा प्रस्ताव शिवसेनेने विरोधकांच्या मदतीने हाणून पाडला होता; मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष अधिकार वापरून हे भूखंड मेट्रोसाठी दिले. त्यानंतर बुधवारी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मेट्रोच्या गिरगाव आणि काळबादेवी स्थानकांसाठी 38 झाडे कापण्याचा आणि 30 झाडे पुनर्रोपित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्याला शिवसेनेसह सर्व विरोधकांनी विरोध केला. प्रस्ताव आयत्या वेळी मांडण्यात आलेला असल्याने त्यावर निर्णय घेता येणार नाही, अशी भूमिका मांडण्यात आली. त्यावर प्रस्ताव जनहिताचा असल्याने तो मंजूर करावा, अशी विनंती आयुक्त अजोय मेहता यांनी केली; मात्र ती अमान्य करत प्रस्ताव राखून ठेवण्यात आला. त्यावर या प्रस्तावासाठी आठवडाभरात विशेष बैठक घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 

मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रस्ताव रखडला असला, तरी वृक्ष प्राधिकरणाने अंधेरी ते दहिसरच्या मेट्रोच्या सातव्या टप्प्यासाठी वडाळ्यात बांधण्यात येणाऱ्या कास्टिंग यार्डसाठी आठ झाडे कापण्याचा आणि तीन झाडे पुनर्रोपित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. 

त्या त्या वेळी निर्णय 

काळबादेवी आणि गिरगावमधील रहिवाशांचे मेट्रोमुळे विस्थापन होणार असल्याने शिवसेनेने प्रकल्पाला विरोध केला आहे. आता तोडण्याचा प्रस्ताव असलेली झाडेही काळबादेवी आणि गिरगावमधील असल्याने त्याबाबत शिवसेना काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत; मात्र त्याबाबत योग्य वेळी निर्णय घेऊ, असे सभागृह नेत्या तृष्णा विश्‍वासराव यांनी सांगितले. प्रत्यक्ष जागेची पाहणी केल्यानंतरच निर्णय घेऊ, असे मनसेचे दिलीप लांडे यांनी सांगितले. 

Web Title: Three metro route not accept