esakal | अरबी समुद्रात आणखी तीन दीपस्तंभ उभारणार
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

अरबी समुद्रात आणखी तीन दीपस्तंभ उभारणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भाईंदर : अरबी समुद्रातील खुट्याची वाट या ठिकाणी अलीकडेच उभारण्यात आलेल्या दीपस्तंभानंतर उत्तनच्या मच्छीमारांसाठी समुद्रात आणखी तीन ठिकाणी दीपस्तंभ लवकरच उभारले जाणार आहेत. या तिन्ही ठिकाणी पाण्यात मोठे खडक असल्यामुळे मासेमारी नौकांसाठी अत्यंत धोकादायक आहेत.

उत्तनहून समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांसाठी वाशी खडक, कातल्याची वाट खडक आणि सऱ्याची वाट खड़क ही समुद्रातील तीन ठिकाणे अत्यंत धोकादायक आहेत. या भागात पाण्याखाली मोठे खडक आहेत. रात्रीच्या अंधारात या ठिकाणी मासेमारी नौकांसाठी मार्ग काढणे ही मच्छीमारांसाठी अक्षरश: तारेवरची कसरत असते. पूर्वी मच्छीमारांनी स्वतःच दिव्याची सोय केली होती, परंतु सोसाव्याच्या वाऱ्यात त्या ठिकाणी ही सोय तग धरू शकली नाही. याच भागातील खुट्याची वाट परिसरातही हीच परिस्थिती आहे.

हेही वाचा: भोसरी, दिघी, इंद्रायणी भागातून पूरग्रस्तांना मदत

या भागातून जाणाऱ्या मासेमारी नौकांसाठी काही महिन्यांपूर्वीच कायमस्वरूपी दीपस्तंभ उभारण्यात आला आहे. याच धर्तीवर उर्वरित तीन ठिकाणीही दीपस्तंभ उभारण्यात यावेत, अशी स्थानिक मच्छीमारांची मागणी होती. यासंदर्भात खासदार राजन विचारे यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे नुकतीच एक बैठक आयोजित केली होती. या वेळी आमदार गीता जैन, स्थानिक मच्छीमार नेते जॉर्जी गोविंद, मिरा-भाईंदर पालिकेचे आयुक्त दिलीप ढोले तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: नांदेडच्या बसस्थानक स्थलांतरासाठी हालचालीला वेग; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

तीन कोटी ५८ लाखांचा निधी मंजूर

जिल्हाधिकाऱ्यांनी आयोजित बैठकीत तिन्ही ठिकाणी दीपस्तंभ उभारण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या कामासाठी ३ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

loading image
go to top